बेळगाव : वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून मुख्य बाजारपेठेसह शहरातील अतिक्रमण हटविले जात आहे. यंदे खूट ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंतच्या रस्त्याकडेला नो पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी ‘ट्रॅफिक कोन’ उभारले होते. मात्र, तेथील कोन आडवे झाले असल्याने वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने पार्क करत आहेत. विविध ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहेत. मात्र, नवीन पार्किंगसाठी महापालिकेकडून जागांची निश्चिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरातील पार्किंग समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. बेळगावात कोल्हापूर, चंदगड, गोवा आदी भागातून नागरिक खरेदीसाठी येत असतात.
विशेष करून दिवाळी, दसरा आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते. मात्र, वाहने पार्क करण्यास पार्किंग स्थळ नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी पे पार्किंग व्यवस्था आहे तेथील पार्किंग देखील फुल्ल होत असते. त्यामुळे वाहने पार्क करण्याची पंचाईत होत आहे. यावर महापालिका आणि पोलिसांनी कायमस्वरुपी तोडगा काढणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने वाहनचालकांना जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करावी लागत आहेत. पण तशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याने वाहनचालकांची गोची झाली आहे. यंदे खूट ते धर्मवीर संभाजी चौकाकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेला नो पार्किंग झोन आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी ट्रॅफिक कोन उभारले होते. पण वाहनचालकांनी वाहने पार्क करताना सदर कोन आडवे केले आहेत. पण त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.









