चालूवर्षी दूध उत्पादक -शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा मोठा प्रश्न
वार्ताहर /उचगाव
मार्कंडेय नदीला चालूवर्षीच्या पावसाळी हंगामामध्ये दोनवेळा महापूर आल्याने नदीच्या दुतर्फा असलेल्या नदीकाठावरील जनावरांना खाऊ घालणारा ओला चारा (गवत) पुराच्या पाण्याखाली गेल्याने कुजून खराब झाला आहे. त्यामुळे चालूवर्षी चाऱ्याचा मोठा प्रश्न दुग्ध उत्पादक आणि शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शेतकरी तसेच दूध व्यावसायिकांनी आता ओला चारा कोठून आणायचा आणि दुग्ध व्यवसाय कसा टिकवायचा, या चिंतेने हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
बेळगावच्या पश्चिम भागातून वाहणारी मार्कंडेय नदी आणि या नदीच्या दुतर्फा पसरलेला ओल्या चाऱ्याचा मोठा भाग आहे. या चाऱ्यावरतीच शेतकऱ्यांची तसेच दूध उत्पादकांच्या गायी, म्हशी अवलंबून असतात. मात्र जून, जुलै या दोन महिन्यांमध्ये सातत्याने दोनवेळा मार्कंडेय नदीला महापूर आल्याने नदीकाठाचा संपूर्ण भाग हा पाण्याखाली गेला. आणि नदीकाठाला असलेला ओला चारा या पुराच्या पाण्याखाली गेल्याने संपूर्ण ओला चारा खराब झाला. परिणामी शेतकरी तसेच दूध उत्पादकांचे चाऱ्यासाठी मोठे हाल होत आहेत. या परिसरातील राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, उचगाव, तुरमुरी, बाची, हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा व या संपूर्ण भागातून मार्कंडेय नदी वाहत असते. आणि या नदीच्या दुतर्फा नदीकाठाचा भरपूर भाग हा ओल्या चाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
सदर मार्कंडेय नदीला पूर आला नाहीतर सातत्याने तीन चारवेळा या ओल्या चाऱ्याची कापणी करून जनावरांना घालण्यात येते. या ओल्या चाऱ्यावरतीच गायी, म्हशी दुधाचे प्रमाण अधिक वाढवतात. मात्र चालूवर्षीच्या हंगामात चाऱ्याचा प्रश्न बिकट निर्माण झाल्याने याचा परिणाम थेट दूध उत्पादनावरती झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना याची चिंता लागून राहिली आहे.
शासन शेतकऱ्यांसाठी मदत करणार का?
चालूवर्षीच्या हंगामात पावसाळी सीजनमध्ये दोनवेळा महापूर आल्याने हा भाग जलमय झाला. यामुळे ओला चारा मिळणे कठीण झाले आहे. याबरोबरच नदीच्या दुतर्फा असलेल्या अनेक शेतीतील ओला चारा मिळतो. पण तोही पाण्याखाली गेल्याने सध्या ओला चारा मिळणे कठीण झाले आहे. शासन यावरती काही विचार करेल का? आणि शेतकरी, दूध उत्पादकांना काही मदत मिळेल का, अशी विचारणा तमाम शेतकरी आणि दूध उत्पादकांतून करण्यात येत आहे.









