सांगली / सचिन ठाणेकर :
महाराष्ट्राच्या शौर्यगाथेचे प्रतीक असलेल्या बारा ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृतींनी ‘युनेस्को’च्या मंचावर थेट आपली छाप उमटवली आहे. सांगलीच्या रमेश बलुरगी या आंतरराष्ट्रीय मॉडेल मेकर आणि कलाशिक्षकाच्या अद्भुत कलेमुळे हे शक्य झालं. विशेष म्हणजे या किल्ल्यांच्या प्रतिकृती ‘युनेस्को’च्या ४६ व्या अधिवेशनात सादर झाल्यानंतर, उपस्थित सुमारे दोन हजार प्रतिनिधींनी या कलाकृतींचं मनापासून कौतुक केलं आणि शिवरायांच्या बारा किल्ल्यांवर जागतिक वारसा अशी मोहर उमटवली गेली! या ऐतिहासिक कार्यात एका सांगलीकराचा सहभाग असणे ही सांगलीसाठी महत्त्वपूर्ण घटना ठरली आहे.
प्रतापगड, रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या ऐतिहासिक किल्ल्यांना नुकताच ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालं या सर्व किल्ल्यांच्या सजीव प्रतिकृती दिल्लीतील ‘युनेस्को’ अधिवेशनात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने सादर केल्या. अध्यक्ष उमेश झिरपे, उपाध्यक्ष ऋषिकेश यादव व त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य कलाप्रदर्शने उभी राहिली.
- एका किल्ल्यावरही न जाता साकारली अचूक प्रतिकृती!
रमेश बलुरगी हे हरिपूर (सांगली) येथील असून, सध्या श्रीमती सुंदराबाई दगडे हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी त्यांनी एकाही किल्ल्याला प्रत्यक्ष भेट दिली नाही. गिर्यारोहण संघटनेने ड्रोनच्या सहाय्याने केलेले स्कॅनिंग, मोजमाप, आणि माहितीच्या आधारावर त्यांनी या सुंदर प्रतिकृती साकारल्या. त्यांची कल्पकता आणि बारकाईनं घेतलेली रचना पाहून किल्ल्यांचे खरेपण डोळ्यांसमोर उभे राहते.
- कलेचा अर्क – साहित्य व प्रक्रिया
या प्रतिकृती तयार करताना कागदाचा लगदा, ॲक्रेलिक रंग, सनबोर्ड, लाकडाचा भुसा आणि फेव्हिकॉल यांचा वापर करण्यात आला. रायगड आणि राजगडच्या प्रतिकृती सुमारे ३५० किलो वजनाच्या आहेत, तर इतर किल्ल्यांचे वजन ८० ते १५० किलो दरम्यान आहे. वाहतूक सुलभ व्हावी म्हणून लोखंडी फ्रेम व चाके लावलेली व्यवस्था करण्यात आली.
- प्रतिकृती साताऱ्यातील शिवसंग्रहालयात!
या ऐतिहासिक प्रतिकृती आता साताऱ्यातील ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालया’मध्ये जतन व संवर्धनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. येथे त्या सर्वसामान्यांसाठी प्रदर्शनासाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

- कलाशिल्पकारांचा गौरव
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या १२ गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याचे भाग्य लाभल्याचा मला अत्यंत अभिमान आहे. ही संधी मिळाल्याबद्दल मी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचा अत्यंत ऋणी आहे,”
-रमेश बलुरगी, आर्किटेक्ट मॉडेल मेकर व कलाशिक्षक, हरिपूर (सांगली)
- ‘तरुण भारत’ मध्ये प्रथम प्रसिद्धी!
रमेश बलुरगी यांनी केलेल्या या प्रतिकृतींची पहिली बातमी तरुण भारत ने यावर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध केली होती. “गडकोट जागतिक वारसा ठरवण्यासाठी सांगलीचा हातभार” असा त्या बातमीचा मथळा होता. पाच महिन्यांमध्ये युनेस्कोला शिवरायांच्या गडकोटांची आणि बलुरगी यांनी साकारलेल्या प्रतिकृतींची इतकी भुरळ पडली की आता हे दुर्ग जागतिक वारसा बनले आहेत. एका सांगलीकराचा त्यामध्ये असलेला सहभाग हा सांगलीच्या दृष्टीने उत्साहवर्धक आणि अभिमानाचा ठरणार आहे.








