वृत्तसंस्था/ बेकेनहॅम
यजमान इंग्लंड आणि भारत 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा संघामध्ये येथे सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारतीय युवा संघाने पहिल्या डावात 540 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर शेवटची बातमी हाती आली त्यावेळी इंग्लंड युवा संघाने चहापानापर्यंत पहिल्या डावात 2 बाद 109 धावा जमविल्या.
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने अलिकडेच इंग्लंड युवा संघाचा टी-20 मालिकेत पराभव केला आहे. त्यानंतर या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय युवा संघाने दमदार फलंदाजी केली. पहिल्या डावात कर्णधार आयुष म्हात्रेने दमदार शतक (102 धावा) झळकाविले. विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू, अंबरीश, राहुलकुमार यांनी अर्धशतकांची नोंद केली.
भारतीय युवा संघाने 7 बाद 450 या धावसंख्येवरुन रविवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि शेवटच्या 3 फलंदाजांनी 90 धावांची भर घातली. अंबरीशने 124 चेंडूत 12 चौकारांसह 70 धावा झळकाविल्या. पटेलने 81 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 38 तर इनानने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी म्हात्रेने 2 षटकार आणि 14 चौकारांसह 102, मल्होत्राने 1 षटकार आणि 9 चौकारांसह 67, कुंडूने 95 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 90 तसेच राहुलकुमारने 81 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांसह 85 धावा झळकाविल्या. इंग्लंड युवा संघातर्फे ग्रीन आणि अल्बर्ट यांनी प्रत्येकी 3 तर होम आणि वॉन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
इंग्लंड युवा संघाने आपल्या डावाला सावध सुरुवात केली पण पहिल्या षटकात त्यांचा सलामीचा फलंदाज वॉन 2 धावांवर पायचीत झाला. डिनेलीने 5 चौकारांसह 27 धावा जमविल्या. हेनिल पटेलने त्याला त्रिफळाचीत केले. कर्णधार हमझा शेख आणि फिल्नटॉप यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 72 धावांची भागिदारी केली. शेख 8 चौकारांसह 55 तर फिल्नटॉप 4 चौकारांसह 25 धावांवर खेळत आहे. भारतीय युवा संघातर्फे हेनिल पटेलने 16 धावांत 2 गडी बाद केले. हा कसोटी सामना चार दिवसांचा आहे.
संक्षिप्त धावफलक – भारत युवा संघ प. डाव 112.5 षटकात सर्वबाद 540 (म्हात्रे 102, कुंडू 90, राहुलकुमार 85, अंबरीश 70, मल्होत्रा 67, हेनिल पटेल 38, अवांतर 28, ग्रीन व अल्बर्ट प्रत्येकी 3 बळी, होम व वॉन प्रत्येकी 2 बळी), इंग्लंड युवा संघ प. डाव (चहापानापर्यंत) 26 षटकात 2 बाद 109 (शेख खेळत आहे 55, फिल्नटॉप खेळत आहे 25, डिनेली 27, हेनिल पटेल 2-16).









