वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चेन्नईचा 24 वर्षीय बुद्धिबळपटू हरिकृष्णन ए रा हा भारताचा 87 वा ग्रँडमास्टर ठरला आहे. फ्रान्समध्ये सुरु असलेल्या ला प्लेगेनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत हरिकृष्णनने तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म पटकाविला. 3 ग्रँडमास्टर नॉर्म मिळविणाऱ्या बुद्धिबळपटूला ग्रँडमास्टरचा किताब दिला जातो.
चेन्नईच्या हरिकृष्णनने काही वर्षापूर्वी पहिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळविला होता. त्यानंतर त्याने दुसरा ग्रँडमास्टर नॉर्म स्पेनमधील स्पर्धेत पटकाविला. भारतातर्फे आता एकूण 87 ग्रँडमास्टरर्स बुद्धिबळपटूंची नोंद झाली आहे. यापूर्वी एल. आर. श्रीहरी हा भारताचा 86 वा ग्रँडमास्टर होता. हरिकृष्णनला ग्रँडमास्टर शामसुंदर मोहनराजचे मार्गदर्शन मिळत आहे.









