उगार खुर्द नगरपरिषदेच्या एका वॉर्डसाठी 17 ऑगस्टला मतदान :29 जुलै रोजी अधिसूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या 5 नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध कारणांनी रिक्त झालेल्या विविध शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी यासंबंधीची घोषणा केली. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील उगार खुर्द नगरपरिषदेच्या वॉर्ड क्र. 15 साठी 17 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कोलार जिल्ह्यातील वेमगल कुरुगल, चिक्कमंगळूर जिल्ह्यातील अज्जमपूर, मंगळूर जिल्ह्यातील कडब, हावेरी जिल्ह्यातील रट्टीहळ्ळी आणि कलबुर्गी जिल्ह्यातील काळगी नगरपंचायतींसाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या नगरपंचायतींसाठी 17
ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.
विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या उगार खुर्द नगरपरिषदेच्या वॉर्ड क्र. 15, विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी नगरपंचायतीतील वॉर्ड क्र. 5 आणि रायचूर जिल्ह्यातील सिरवार नगर पंचायतीतील वॉर्ड क्र. 12 साठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
20 ऑगस्ट रोजी मतमोजणी
संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी 29 जुलै रोजी निवडणूक अधिसूचना जारी करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 5 ऑगस्ट शेवटचा दिवस असेल. 6 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी होईल. माघार घेण्यासाठी 8 ऑगस्ट अखेरचा दिवस असेल. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. 20 ऑगस्ट रोजी तालुका केंद्रांमध्ये मतमोजणी होईल. 29 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीत संबंधित शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात आणि पोटनिवडणूक होत असलेल्या वॉर्डांच्या हद्दीत निवडणूक आचारसंहिता जारी राहणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.









