वृत्तसंस्था / हेग (नेदरलँड्स)
2026 साली आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इटली आणि नेदरलँड्स यांनी पहिल्यांदाच आपली पात्रता सिद्ध करुन नवा इतिहास घडविला आहे. सदर आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने भरविली जाणार आहे.
2026 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सुरू असलेल्या युरोपियन विभागातून पात्रतेची स्पर्धा आयोजित केली होती. या पात्रतेच्या स्पर्धेतील शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात नेदरलँड्सने इटलीचा 9 गड्यांनी पराभव केला. पण युरोपियन विभागातून इटली, नेदरलँड्स हे दोन्ही संघ पात्र ठरले आहेत. या पात्रतेच्या सामन्यात इटलीने नेदरलँड्सला विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले. इटलीने 20 षटकात 7 बाद 134 धावा जमविल्या. त्यानंतर नेदरलँड्सने केवळ एका गड्याच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले.
पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आतापर्यंत 15 संघ पात्र ठरले आहेत. आणखी तीन संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. आफ्रिका विभागातून दोन संघांना संधी दिली जाईल. या स्पर्धेसाठी आतापर्यंत अफगाण, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाक, द. आफ्रिका, श्रीलंका, अमेरिका आणि विंडीज, इटली व नेदरलँड्स असे 15 संघ पात्र ठरले आहेत.









