शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार केल्याचा संशय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) सध्या मार्केटमधील फेरफार रोखण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. भारतीय शेअर बाजारातील कथित पंप-अँड-डंपची मोठी चौकशी सुरू असून सध्या सुमारे 200 सूचीबद्ध कंपन्या संशयास्पद गुंतवणूकदारांना शेअर्सच्या किमती वाढवल्याबद्दल रडारवर आहेत. या कंपन्या ‘पंप-अँड-डंप’द्वारे शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार करत असल्याचा संशय आहे. या प्रकरणात अजूनही चौकशी सुरू आहे. सेबीच्या या मोहिमेमुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
गेल्या तीन दिवसांत सेबीने 80 हून अधिक ठिकाणी शोधमोहिमा राबवल्या आहेत. नियामकाने 100 हून अधिक संगणक आणि 150 मोबाईल फोनवरून डेटा जप्त करत एक व्यापक डिजिटल तपास सुरू केला. सेबीची ही मोठी कारवाई गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अनेक महिन्यांपासून चालवल्या जाणाऱ्या व्यापक मोहिमेचा एक भाग आहे. जागतिक व्यापारी फर्म असलेल्या जेन स्ट्रीटवर सेबीने धोरणात्मक खरेदी-विक्री क्रियाकलापांद्वारे बँक निफ्टी निर्देशांकात फेरफार केल्याचा आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या खर्चावर मोठा नफा कमावल्याचा आरोप केला आहे.









