आपली पृथ्वी अनेक प्रकारांच्या नैसर्गिक आश्चर्यांनी भरलेली आहे. आपल्याला कल्पनाही करता येणे अशक्य होईल, अशी अस्तित्वे या पृथ्वीवर आहेत. विश्वास ठेवणेही अशक्य होईल, असे जीव पृथ्वीवर राहतात. त्यांचा जेव्हा शोध लागतो, तेव्हा निसर्गाचे आणखी एक दालन आपल्या संचारासाठी उघडले जाते.
दहा-बारा वर्षांपूर्वी भारतातच मूळ असणारी छोट्या गाईंची प्रजाती देशाला परिचित झाली होती. वास्तविक ही गाय मूळची भारतातील आंध्र प्रदेशातील असूनही तिच्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे ही प्रजाती नामषेश होण्याच्या मार्गावर होती. तथापि, सुदैवाने काहींचे तिच्याकडे लक्ष गेले आणि या गाईला जीवदान मिळाले. आता या छोट्या प्रजातीच्या गाईंची संख्या वाढू लागली असून त्यांचे दूध हे मोठ्या गाईंच्या दुधापेक्षा तीन ते चार पट अधिक सत्वयुक्त असते, असेही दिसून आले आहे. अशाच प्रकारे एका अश्व प्रजातीची चर्चा होत आहे.
काही वर्षांपूर्वी थंबेलिया नामक छोट्या घोड्याची जगात बरीच चर्चा होती. या घोड्याची लांबी केवळ 44.5 सेंटीमीटर होती. तो 2001 मध्ये जन्माला आला आणि 2018 मध्ये त्याचा मृत्यू झाला. सध्या चर्चेत असणारा घोडा याच प्रजातीचा आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारचे लघु अश्व आज जगात अनेक स्थानी आहेत. त्यांचा तसा फारसा उपयोग होत नाही. तथापि, केवळ एक हौस म्हणून त्यांना पाळले जाते. नाहीतरी आज कोणत्याही प्रकारच्या घोड्याचा उपयोग प्रवासासाठी किंवा वाहतुकीसाठी केला जात नाहीच. युद्धातून तर घोडा केव्हाच बाहेर फेकला गेला आहे. घोड्यांचा उपयोग आता केवळ धार्मिक रितींचा भाग म्हणून केला जातो. तसेच घोड्यांच्या शर्यतींसाठी तो उपयोगात आणला जातो. त्यांच्यावर पैसे लावले जातात आणि घोड्यांना पळायला लावून काही लोक मालामाल होतात किंवा कंगालही होतात. तशाच प्रकारे हे लहान घोडे एक ‘स्टेटस सिंबॉल’ म्हणून पाळले जातात. त्यांची किंमत त्यांच्याइतकी छोटी असत नाही. तर ती मोठ्या घोड्यांपेक्षाही अधिक असू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये असे छोटे घोडे पाळण्याची आवड पुन्हा निर्माण झाल्याने या घोड्यांची मागणी वाढली आहे. तथापि, असे घोडे व्हिडीओत पाहून अनेकांचा, ते खरे असतील, यावर विश्वास बसत नाही. हा कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा प्रताप असावा, अशी काहींची समजूत होते. तथापि, असे घोडे अस्तित्वात आहेत, हे नैसर्गिक सत्य आहे.









