सातारा :
सातारा शहरातील करंजेनाका येथे शेतीसाठी लागणारी बनावट औषधे विक्री करण्यासाठी येणारी टोळी शाहूपुरी पोलिसांच्या डी.बी. पथकाने जेरबंद केली आहे. धैयशिल अनिल घाडगे (वय. 31, रा. समता कॉलनी शाहुपुरी सातारा), युवराज लक्ष्मण मोरे (वय 28, रा. रेवडी ता. कोरेगाव), गणेश मधुकर कोलवडकर (वय 30, रा.धालवडी ता. फलटण), निलेश भगवान खरात (वय 38, रा. जाधववाडी ता. फलटण), तेजस बाळासो ठोंबरे (वय 30, रा. वडुज ता. खटाव), संतोष जालिंदर माने (वय 45, रा. नडवळ ता. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 12 लाख 59 हजार 370 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरामधील करंजे नाका येथे शेतीसाठी लागणारी बनावट औषधे विक्री करण्यासाठी काही लोक चारचाकी गाडीतुन येणार असल्याची माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना प्राप्त झाली. या माहितीच्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांनी पोलीस उपनिरीक्षक ढमाळ व डीबी पथक यांचे पथक तयार करुन त्यांना शेतीसाठी लागणारी बनावट औषधे विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यावेळी बनावट औषधांची खात्री करण्याकरिता टू बडी कन्सलटींग प्रा.लि. कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सतीश तानाजी पिसाळ यांना सोबत घेवुन मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने पोलीस उपनिरीक्षक ढमाळ यांनी डिबी पथकातील अंमलदार यांना सोबत घेवुन करंजे नाका येथे मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सापळा रचुन थांबले. यावेळी करंजे नाका येथे मोलाचा ओढा बाजुकडून एक टेम्पो येताना पाहुन पथकातील लोकांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. गाडी थांबताच गाडी चालकास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने धैर्यशील अनिल घाडगे असे सांगितले. त्यावेळी त्याचे सोबत असलेल्या टेम्पो (क्र.एम.एच.11 बी.एल.0173) मध्ये काय आहे असे विचारले असता त्याने शेतीसाठीची लागणारी औषधे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याच्यावर अधिक संशय आल्याने पथकातील कर्मचारी व टू बडी कन्सलटींग प्रा.लि. कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सतीश तानाजी पिसाळ यांच्या मदतीने गाडीमध्ये असणारी औषधे चेक केली. असिस्टंट मॅनेजर सतीश पिसाळ यांनी ही औषधे बायर कंपनीचे राउन्डअप असे नाव वापरुन बनावट औषधे असल्याची खात्रीशीर पणे सांगितले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक ढमाळ यांनी गाडीसह चालक यास ताब्यात घेतले. 2 लाख 06 हजार 700 रुपये किंमतीचे शेतीसाठी वापण्यात येणारे बायर कंपनीचे राउन्डअप बनावट औषधाच्या एकुण 260 बॉटल व 1 लाख रुपये किंमतीचा छोटा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
या जप्तीच्या कारवाईनंतर शाहुपूरी पोलीस ठाण्यात कॉपी राईट कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीकडे गुह्याच्या अनुषंगाने चौकशी करुन त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, पोलीस उप-निरीक्षक ढेरे व गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार यांनी सदर गुह्याचा तपास करुन गुह्याचे तपासा दरम्यान एकुण 6 आरोपी यांना अटक करुन त्यांच्याकडून रेवडी (ता. कोरेगाव), फलटण व वडूज येथील कारखान्यातुन एकुण 12 लाख 59 हजार 370 रुपयाचे बायर कंपनीचे बनावट राउन्डअप औषधे व चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे.
गुह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ हे करीत आहेत. या कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी ढेरे, पोलीस उपनिरीक्षक ढमाळ व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे, जयवंत घोरपडे यांनी केली आहे.








