शालेय शिक्षण विभागाचा निर्णय : सुधारीत वेळापत्रकाची तयारी
बेळगाव : प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया लवकरच राबविली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी शनिवारी एक आदेश बजावला असून लवकरच बदलीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बेळगाव शहरासह तालुका, जिल्हा व राज्यातील अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरती यादी आठ दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. बेळगाव तालुक्यात 100 हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरले होते. तर शहरातील अतिरिक्त शिक्षकांची संख्याही मोठी आहे. अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर केल्यानंतर ज्या ठिकाणी शिक्षकांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.
बदली प्रक्रियेची प्रतीक्षा
शिक्षकांकडून मागील अडीच दिवसांपासून बदली प्रक्रियेची वाट पाहिली जात आहे. यावर्षीच्या पटसंख्येच्या आधारे अतिरीक्त शिक्षकांची यादी तयार करण्यात आली. 19 जून रोजी बदली प्रक्रियेचे वेळापत्रक शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले होते. यामध्ये काही तांत्रिक दोष असल्यामुळे सुधारीत वेळापत्रक येत्या काही दिवसात प्रसिद्ध केले जाणार आहे.
लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करणार
शिक्षण विभागाने शनिवार दि. 5 रोजी नवा आदेश देऊन लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्याचे स्पष्ट केले आहे. सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, सहशिक्षक, विशेष शिक्षक तसेच क्रीडा शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.









