राजकारण्यांनी वयाच्या 75 वर्षांनंतर निवृत्ती घ्यावी असे विधान, विरोधकांकडून भाजपवर टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राजकारणी लोकांनी वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घ्यावी, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय गदारोळ उठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाला येत्या सप्टेंबरमध्ये 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ते सरसंघचालकांचा सल्ला मानून आपल्या राजकीय निवृत्ती स्वीकारणार का, असा प्रश्न विरोधी नेत्यांनी विचारला आहे. मात्र, संघाने भागवत यांनी निवृत्ती वयाविषयी एक शब्दही उच्चारलेला नाही, अशी स्पष्टोक्ती केलेली आहे.
9 जुलैला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असणाऱ्या नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनकार्यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मोरोपंत पिंगळे यांचा सत्कारही करण्यात आला. हा कार्यक्रम पिंगळे यांच्या पंचाहत्तरीच्या निर्मित्ताने आयोजित करण्यात आला होता.
पिंगळे यांचे अवतरण
या कार्यक्रमात भाषण करताना भागवत यांनी पिंगळे यांचेच एक अवतरण उधृत केले. पिंगळे वयोवृद्ध झाल्यानंतर एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी वयाच्या 75 वर्षांनंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली पाहिजे, असे विधान केले होते. त्याचा संदर्भ भागवत यांनी दिला. 75 व्या वाढदिनी जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सत्कार केला जातो आणि या व्यक्तीच्या पाठीवर शाल लपेटली जाते, तेव्हा त्या व्यक्तीने आता आपण निवृत्त झाले पाहिजे. हे ओळखावयास हवे. ही शाल ‘आता तुम्ही निवृत्त व्हा आणि नव्या लोकांसाठी स्थान रिकामे करा, हा संदेश देत असते. असे विधान मोहन भागवत यांनी केले होते. आता या विधानामुळे विवाद निर्माण झाला असून या विधानाला राजकीय रंगही देण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रश्न
भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सल्ल्यानुसार वागतो. तेव्हा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोहन भागवत यांचा सल्ला मानला पाहिजे आणि 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घोषित केली पाहिजे, अशी सूचना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत या दोघांनीही सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घ्यावी आणि एकमेकांना मार्गदर्शन करावे, अशी खोचक सूचना काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनीही केली आहे.
राऊत यांची टीका
शिवनेतेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 वर्षांनंतर निवृत्त व्हावे, असा सल्ला दिला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी ज्येष्ठ नेत्यांना 75 वर्षे पूर्ण झाल्याचे कारण दाखवून निवृत्त करण्यात आले. तेच उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात स्वीकारले जाईल का, अशी पृच्छा संजय राऊत यांनी शुक्रवारी केली आहे.
संघाकडून निराकरण
मोहन भागवत यांचे विधान संदर्भ सोडून प्रसारित करण्यात येत आहे. या विधानाला मोरापंत पिंगळे यांचा संदर्भ आहे. मोहन भागवत यांनी राजकारण्यांच्या निवृत्ती वयाविषयी एक शब्दही उच्चारला नाही. त्यांनी मोरोपंत पिंगळे यांच्यावरच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना त्यांचेच वक्तव्य उधृत केले. याचा संबंध पिंगळे यांच्याशी असून अन्य कोणाशीही नाही. या वक्तव्यावरुन इतका गदारोळ माजण्याचे कारण नाही, अशी स्पष्टोक्ती संघाकडून करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांचेही अनेक नेते 75 वर्षांच्या पुढचे असून आजही राजकारणात आहेत, अशीही टिप्पणी या संदर्भात अनेक जणांनी सोशल मिडियावर केली आहे.









