निवडीने समभागात दिसली तेजी : 5 वर्षासाठी नियुक्ती
मुंबई :
शुक्रवारी शेअरबाजारात हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागात एकदम तेजी पाहायला मिळाली. कंपनीचा समभाग 3.7 टक्के वाढीसह 2500 रुपयांच्या स्तरावर पोहचला होता. यामागे कारण होतं नव्या सीईओ नियुक्तीचं. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या सीईओपदी नव्याने प्रिया नायर यांना निवडलं गेलं आहे. यासंबंधीची घोषणा होताच शेअरबाजारात समभागात तेजी दिसली.
नव्या सीईओंची ओळख
प्रिया नायर या युनिलिव्हर, लंडन मध्ये ब्युटी अँड वेलबिंगच्या ग्लोबल अध्यक्ष आहेत. या ब्रँडची उपस्थिती 20 हून अधिक देशात आहे. प्रिया यांनी 1995 मध्ये युनिलिव्हरमध्ये ग्लोबल लिडरशिप एक्झीक्युटीव्ह म्हणून करिअरची सुरुवात केली होती. जागतिक नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला आहेत. ब्रँडचा विकास, डिजिटल कॉमर्स व कल्पकतेच्या जोरावर व्यवसायाचे रुप पालटले आहे. यापूर्वी त्या एचयुएलमध्ये होम केअर(दक्षिण) च्या कार्यकारी संचालक म्हणून राहिल्या आहेत. सिडेनहम कॉलेजमध्ये कॉमर्स पदवीसह सिम्बायोसिस, पुणे येथे एमबीए केले होते. तसेच हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक्झिक्युटीव्ह कोर्सही केला आहे. आता यापुढे प्रिया या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ पद सांभाळणार आहेत. 1 ऑगस्ट 2025 पासून त्या या पदाची धुरा पुढील 5 वर्षासाठी सांभाळणार आहेत. या बातमीने शेअरबाजारात शुक्रवारी कंपनीच्या समभागावर सकारात्मक परिणाम दिसून आला. समभाग 3 टक्के वाढलेला दिसला. याचदरम्यान कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 5.86 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झालेले आहे.
रोहीत जावा यांनी सोडलं पद
याच दरम्यान या पदावर पूर्वी रोहीत जावा हे कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण खासगी व व्यावसायिक जीवनात पुढे जाण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या 37 वर्षात करिअरमध्ये चांगला अनुभव प्राप्त करता आला व आशियातील मिळालेल्या जबाबदाऱ्यांबाबतही आपण समाधानी आहोत, असेही ते म्हणाले.









