राज्य शेतकरी संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील काही गावात कर्ज घेतलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कुटुंबीयांचा छळ करण्यात येत असून, प्रसंगी घरातील साहित्य विस्कटण्यात येत आहे. यामुळे आमच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच कर्ज घेतलेल्या रकमपैकी 5 टक्के रक्कम देऊन नंतर 100 टक्के कर्ज वसूली करण्यात येत आहे. तुमच्या मरणाशी आम्हाला देणे-घेणे नाही, आम्हाला केवळ आमचे पैसे महत्त्वाचे असल्याचे वसुली कर्मचारी म्हणत आहे. यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. यामुळे नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर आळा घालण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ व राज्य शेतकरी संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैलहोंग तालुक्यातील गजमीनाळ, मास्तमर्डी, होसकोटी, होण्णूर येथील काही कुटुंबीयांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. पण कंपन्यांकडून केवळ एकूण कर्जापैकी 5 टक्केच रक्कम देण्यात आली. आता त्यांच्याकडून 100 टक्के रकमेची मागणी होत आहे. तसेच घराकडे येऊन कर्मचारी घरातील साहित्यांची नासधूस करून कुटुंबीयांना घराबाहेर काढत आहेत. यामुळे अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांवर आळा घालून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राघवेंद्र नाईक, वजीरप्पा बंबरगी, अडिवेप्पा कमतगी, भारती पाटील, सन्नप्पा सनदी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









