सातारा :
सातारा जिह्यातील 37 जणांची शौर्य यात्रा व नील यात्रा कंपनीची ट्रीप जाणार असल्याचे सांगून फसवणूक करण्यात आली आहे. ट्रीपला न नेता बुकींगची रक्कम 15 लाख 36 हजार 950 रूपये परत दिली नाही. याप्रकरणी जयवंत रामचंद्र वारागडे (वय 59, रा. शनिवार पेठ सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गतवर्षीच्या जून महिन्यात जयवंत वारागडे व इतर 36 जणांना ऑनलाईन शौर्य यात्रा व नील यात्रा या टुर्स कंपनीची माहिती मिळाली. या कंपनीतील मयुरेश वाघ, काजल निमसे, सपना वाघ, शुभांगी कदम, अनुजा सुवर्णा भालेराव यांनी कंपनी पॅकेजमध्ये भारत, गंगासागर व दुबई या ठिकाणी फिरायला घेऊन जाणार असल्याची माहिती देऊन विश्वासात घेतले. यासाठी 75 हजार रूपयांचे पॅकेज होते. या पॅकेजनुसार जयवंत वारागडे व इतरांना ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले. लवकरच फिरायला जायला मिळणार असा विश्वास दाखवला. परंतु सहा महिने झाले तरी ट्रीप गेली नाही. याबाबत सगळ्यांनी विचारणा करण्यास सुरूवात केली. मात्र काहीही माहिती न देता टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. ट्रीप जात नसल्याने पैशाची मागणी केली. परंतु पैसे परत देत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी जयवंत वारागडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करत आहेत..








