बेळगाव : सावरकर रोड, टिळकवाडी येथील एका घरात आणि हिंदवाडी येथील अमित डिलक्स लॉजिंगमध्ये झालेल्या चोरी प्रकरणांचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. 5 लाख 70 हजार रुपये किमतीचे 58.860 ग्रॅम वजनाची दोन सोन्याची काकणे, 2 लाख 50 हजार रुपये किमतीची यामाहा आर-15 मोटारसायकल आणि एक ओप्पो कंपनीचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 8 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सावरकर रोड येथे एका घरात चोरी झाली होती.
त्याचबरोबर हिंदवाडी येथील अमित डिलक्स लॉजिंगमध्ये देखील चोरीची घटना घडल्याने या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला होता. दोन्ही प्रकरणांच्या तपासात काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र, नेमके चोरटे कोण आहेत? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अद्याप कोणालाही अटक झाली नसली तरी लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश येईल, असे टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशराम पुजेरी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









