वीजबिलातील तफावत वाढत असल्याने हेस्कॉमचे पाऊल
बेळगाव : हेस्कॉमकडून नवीन कनेक्शन घेताना डिपॉझिट भरून घेतले जाते. परंतु, बऱ्याच वर्षानंतर डिपॉझिटची रक्कम व सध्याचे वीजबिल यामध्ये तफावत असल्यामुळे डिपॉझिट वाढवून घेतले जाते. ज्या ग्राहकांचे वीजबिल डिपॉझिटपेक्षा वाढलेले आहे अशा ग्राहकांना डिपॉझिट भरण्यासाठी नोटीस पाठविली जात आहे. शहरातील अनेक ग्राहकांना अशा प्रकारच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. हेस्कॉमकडून अॅडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट डिमांड नोटीस ग्राहकांना पाठविली जात आहे. प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये डिपॉझिटचा उल्लेख केलेला असतो. परंतु, अनेकवेळा डिपॉझिटची रक्कम वाढवून घ्या, असे सांगूनही डिपॉझिट न भरणाऱ्या ग्राहकांना स्वतंत्रपणे नोटिसा पाठविल्या जात आहेत. वेळेत डिपॉझिट न भरणाऱ्या ग्राहकांवर भविष्यात कारवाई होण्याची शक्यता आहे. हेस्कॉमच्या नियमावलीनुसार दोन महिन्यांच्या वीजबिलाइतके ग्राहकाचे डिपॉझिट असणे आवश्यक आहे. परंतु, सध्या बऱ्याच ग्राहकांचे वीजबिल वाढले असल्याने डिपॉझिटची सरासरी कमी होत आहे. पूर्वी 500 ते 1000 रुपये डिपॉझिट रक्कम घेतली जात होती. सध्याचे बिल वाढल्यामुळे ही रक्कम कमी होत असल्याचे हेस्कॉमकडून सांगण्यात आले.
वेळेत डिपॉझिट भरण्याची सूचना
सध्या लाईनमनकडून डिपॉझिट फरकातील रक्कम ग्राहकांना नोटीसच्या माध्यमातून दिली जात आहे. नेमके कशाचे डिपॉझिट आहे, हे ग्राहकांना समजत नसल्यामुळे गोंधळ निर्माण होत आहे. बरेच लाईनमन हे कन्नड भाषिक असल्यामुळे त्यांना मराठी भाषिकांना नोटीसबद्दल व्यवस्थित माहिती देता येत नाही. योग्य माहिती न मिळाल्याने ग्राहकांचा गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे. वेळेत डिपॉझिट भरण्याची सूचना हेस्कॉमकडून करण्यात आली आहे.









