बेळगाव : एका संस्थेने केलेल्या बेस्ट मेडिकल कॉलेजीस ऑफ इंडिया या सर्वेक्षणात देशातील 184 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘बिम्स’ने 32 वा क्रमांक पटकाविला आहे. गेल्यावर्षी 33 व्या क्रमांकावर असलेल्या बिम्सने यावर्षी एका स्थानाने आपली स्थिती सुधारली आहे. यामुळे बिम्सचा दर्जा उंचावल्याचे दिसून येते. तसेच प्रतिष्ठादेखील दुप्पट झाली आहे. इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात बिम्समधील आवश्यक सुविधा, वैज्ञानिक सुलभता, नोकरी केंद्रित अभ्यासक्रम, शैक्षणिक गुणवत्ता, कुशल प्रशिक्षण, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्व विकास, नेतृत्वगुण आणि इतर अनेक निकषांवर आधारित 32 वा क्रमांक मिळविला आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर रोडवर बिम्स 2005 मध्ये 33 एकर जागेत बांधण्यात आले आहे. याठिकाणी एमबीबीएसची पहिली बॅच 2010 मध्ये उत्तीर्ण झाली. आतापर्यंत 1500 हून अधिक एमबीबीएस आणि शेकडो पदव्युत्तर विद्यार्थी संस्थेतून उत्तीर्ण झाले आहेत व ते वैद्यकीय सेवेत गुंतले आहेत.
संस्थेने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात एमबीबीएस, पदव्युत्तर (एमडी, एमएस) जीएनएम, बीएससी पॅरामेडिकल, नर्सिंगसह अनेक अभ्यासक्रम राबविले आहेत. बेळगाव जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील आणि राज्याबाहेरील रुग्णांना बिम्समध्ये दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहेत. त्याचा अनेक रुग्णांना लाभ होत आहे. औषध, शस्त्रक्रिया, बालरोग, प्रसूती, स्त्राrरोग, कान आणि घसा, त्वचारोग, डोळ्यांचे उपचार, मानसोपचार आणि दंतचिकित्सा या ठिकाणी उपलब्ध आहेत. बिम्स हॉस्पिटल 24 तास खुले असते. दररोज एक हजार ते 1500 हून अधिक बाह्यारुग्ण आणि 100 ते 120 हून अधिक अॅडमिट रुग्णांना बिम्समध्ये वैद्यकीय सेवा मिळतात. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कुशल डॉक्टर, प्रयोगशाळा, तंत्रज्ञ इत्यादींच्या पाठिंब्यामुळे बिम्स राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नावारुपाला आले आहे. याबाबत बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले आहे.









