बेळगाव : जुना धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाखालील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यातच पावसाचे पाणी थांबत असल्यामुळे खड्डे लक्षात येत नाहीत. अनेक ठिकाणी काँक्रीटच्या सळ्या वर आल्या असून अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. शहरात सर्वत्रच रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसत आहेत. मोठे खड्डे व त्यामध्ये साचलेले पावसाचे पाणी यामुळे अनेक अपघात होत आहेत. शहरात सर्रास हे चित्र दिसत असल्यामुळे स्मार्ट सिटीची वाटचाल खड्ड्यांच्या शहराकडे होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाच्या सर्व्हिस रस्त्याचे काही वर्षांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले. परंतु यातील बरेचसे काँक्रीट वाहनांच्या वर्दळीमुळे उखडले. काही ठिकाणी काँक्रीटमध्ये घातलेल्या सळ्या बाहेर पडल्या आहेत. तात्पुरत्या स्वरुपात या सळ्यांवर काँक्रीट घातले जाते. त्यानंतर पुढील पावसाळ्यात पुन्हा आहे तीच परिस्थिती निर्माण होत आहे. तानाजी गल्ली, समर्थनगर, महाद्वार रोड, मल्लिकार्जुननगर येथील नागरिकांना या रस्त्याने ये-जा करावी लागते. खड्ड्यांमुळे रात्रीच्यावेळी सळ्या निदर्शनास न आल्याने वाहने अडकून अपघात होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालकांतून केली जाते.









