त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
वार्ताहर/नंदगड
खानापूर-तालगुप्पा राज्य मार्गावरील हेब्बाळ गावाजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे खड्ड्याची खोली वाहनचालकाला समजत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.या रस्त्यावरील हेब्बाळ राखीव जंगलाजवळील काही अंतरावर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची उंची आसपासच्या जमिनीपेक्षा कमी राहिल्याने शेतवडीतील पाणी तसेच गटारीचे पाणी रस्त्यावरील खड्यात येऊन पडत असल्याने खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एखादे चारचाकी वाहन रस्त्यावरून गेल्यास रस्त्यावरील खड्ड्यातील पाणी वाहनधारकांच्या अंगावर उडून वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे. खानापूर-तालगुप्पा रस्त्यावरून खानापूर, बेळगावहून दांडेली, कारवार, कित्तूर, धारवाड, बिडी, अळणावर, हल्याळ, नंदगड भागात जाण्यासाठी हा जवळचा आणि एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पावसाळ्dयात ठिकठिकाणी खड्ड्याचे स्वरूप प्राप्त होते. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.









