धामणेकर कुटुंबीयांकडून आगळीवेगळी परंपरा
वार्ताहर /येळ्ळूर
गायीच्या प्रेमापोटी तिला मुलीप्रमाणे सांभाळून तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करून येळ्ळूर येथील राजेंद्र ओमाणा धामणेकर यांनी एक आगळी वेगळी परंपरा निर्माण केली आहे. या कार्यक्रमाची चर्चा परिसरात सुरू असून असा हा गावातील पहिलाच कार्यक्रम असल्याने त्याबाबत औत्सुक्य निर्माण झाले होते. यावेळी त्यांनी डोहाळे जेवणाच्या सर्वविधी करून गायीला पोळी चटणीपासून जिलेबीपर्यंत खाऊ घातले. गोमातेला एका नववधूप्रमाणे पारंपरिक वेशभूषेत सजवून तिचे लाड पुरविण्यात आले. यासाठी गावातील महिलांनी एकच गर्दी केली होती. एकाद्या स्त्राrच्या डोहाळे जेवणाप्रमाणे धामणेकर कुटुंबीयांनी तिची ओटी भरून औक्षण केले. यावेळी महिला वर्गानेही मोठ्या उत्साहात गाईला साड्यांचा आहेर केला.
यावेळी नाडीतज्ञ वृषभ हर्दी अंकलगीकर यांनी महिला वर्गाला प्रबोधन करताना आपण आपल्या संस्कृतीबरोबर संस्कारापासूनही दूर चाललो आहोत. रूढी-परंपरांना तिलांजली देऊन पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यात धन्य मानतो आहोत. यामुळे असे कार्यक्रम नित्याने झाले पाहिजे. तरच आपली संस्कृती व विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतील. जीवनात स्त्राrला जसे अन्यन्य साधारण महत्त्व आहे. तसे वास्तुपूजेत गोमातेला आहे. कारण तिच्या आगमनाने घरातील दृष्टशक्तीचा प्रभाव कमी होतो. या कार्यक्रमाची परिसरात एकच चर्चा असून धामणेकर कुटुंबीयांनी गोमातेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा आदर्श घेवून आपणही आपल्या संस्कृतीचा वारसा जपावा, असे महिलांनी यावेळी सांगितले.









