सिटी जिमखाना संघाचा पराभव
बेळगाव : बेंगलोर येथे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आयोजित केएससीए महिलांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात विजया क्रिकेट क्लबने सिटी जिमखाना संघाचा 154 धावांनी पराभव करत दोन गुण मिळवले. कर्णधार कर्निका कार्तिकला सामनावीर पुरस्कार देण्यात आला तर बेळगावच्या श्रेया पोटेने 75 धावांची मोठी खेळी केली. या सामन्यात विजय क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकात 2 गडीबाद 238 धावा केल्या. कर्णधार कर्निका कार्तिकने 4 षटकार 19 चौकारासह 94 चेंडूत 144 धावा करून दमदार शतक झळकविले. तिला बेळगावच्या श्रेया पोटने 11 चौकारासह 68 चेंडू 75 धावा करून सुरेख साथ दिली. सिटी जिमखाना तर्फे एस जानवी, नंदिनी पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिटी जिमखाना संघाचा डाव 26.4 षटकात 84 धावात आटोपला. त्यात राधीका रमेशने 4 चौकारासह 25, वैष्णवीने दोन चौकाराचा 14 धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. विजया क्रिकेट क्लबतर्फे मनस्वी किरणने 16 धावात 3, अवनीने 6 धावात दोन, तर हर्षिता व रोमा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.









