मुल्डरला दुहेरी मुकुट, द. आफ्रिकेचा डावाने मोठा विजय
वृत्तसंस्था/ बुलावायो
द. आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान झिंबाब्वेचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी द. आफ्रिकेने झिंबाब्वेचा एक डाव आणि 236 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात नाबाद 367 धावा जमविणाऱ्या वियान मुल्डेरने 334 चेंडूत 4 षटकार आणि 49 चौकारांच्या मदतीने नाबाद 367 धावा झळकविल्या. मुल्डरचे नाबाद त्रिशतक या मालिकेतील वैशिष्ट्या ठरले. त्याने या मालिकेत एकूण 531 धावा जमविल्या असून गोलंदाजीत त्याने 7 गडी बाद केल्याने तो ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीरा’चा मानकरी ठरला.
या दुसऱ्या कसोटीत द. आफ्रिकेने आपला पहिला डाव 5 बाद 626 धावावर घोषित केला. त्यानंतर झिंबाब्वेचा पहिला डाव 170 धावावर आटोपल्याने त्यांना फॉलोऑन स्वीकारावा लागला. झिंबाब्वेने 1 बाद 51 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 77.3 षटकात 220 धावावर आटोपला. झिंबाब्वेच्या दुसऱ्या डावात कैतानोने 76 चेंडूत 5 चौकारांसह 40, कर्णधार एर्वीनने 95 चेंडूत 6 चौकारांसह 49, चिवांगाने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22, वेलिंग्टन मात्साकेझाने 3 चौकारांसह 17, वेल्चने 3 चौकार व 2 षटकारांसह 55 धावा जमविल्या. द. आफ्रिकेतर्फे बॉशने 38 धावांत 4, युसुफने 38 धावात 2 तर मुथुसॅमीने 77 धावात 3 तसेच मुल्डरने 24 धावात 1 गडी बाद केला. उपाहारापर्यंत झिंबाब्वेने 47 षटकात 3 बाद 143 धावापर्यंत मजल मारली होती. चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रातच झिंबाब्वेचे उर्वरीत 7 फलंदाज बाद झाले.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका प. डाव 114 षटकात 5 बाद 626 डाव घोषित (मुल्डर नाबाद 367, बेडींगहॅम 82, प्रेटोरियस 78, व्हेरेनी नाबाद 42, ब्रिवेस 30), झिंबाब्वे प. डाव 43 षटकात सर्वबाद 170, झिंबाब्वे दु. डाव 77.3 षटकात सर्वबाद 220 (वेल्च 55, एर्वीन 49, कैतानो 40, बॉश 4-38, युसुफ 2-38, मुथ्युसॅमी 3-77, मुल्डर 1-24).
लाराच विक्रमास लायक : मुल्डर
द. आफ्रिकेच्या मुल्डेरने झिंबाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाबाद 367 धावांची खेळी केली. विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराचा कसोटीतील नाबाद 400 धावांचा विश्वविक्रम मुल्डर मोडणार असे वाटत असतानाच द. आफ्रिकेने डावाची घोषणा केली. या सामन्यात केशव महाराजच्या गैरहजेरीत मुल्डेर संघाचे नेतृत्त्व करीत होता. लाराचा विक्रम मोडीत न काढण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली. पण लेंजेंड लाराचा हा विक्रम स्वत:साठी राखण्यास पात्र आहे, अशी प्रतिक्रिया मुल्डेरने व्यक्त केली. या विक्रमाचा पाठलाग न करण्याच्या निर्णयामागील त्याने कारण स्पष्ट केले.
मुल्डेरने या कसोटीत अनेक विक्रम मोडल्यानंतर तो लाराचा 400 धावांचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर होता. या कसोटीतील खेळाच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर द. आफ्रिकेने डावाची घोषणा करून सर्वांनाच चकीत केले. लारा हा जागतिक क्रिकेट क्षेत्रातील एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. अशा दर्जाच्या व्यक्तीने तो विक्रम राखणे हे पात्र आहे. जर आपल्याला पुन्हा ही संधी मिळाली तर मी त्याचप्रकारे निर्णय घेईल, असे मुल्डेरने म्हटले आहे. लारा हा एक दिग्गज खेळाडू असून तो त्याचा विक्रम राखण्यास पात्र आहे असेही मुल्डेर म्हणाला. मुल्डेरच्या या निर्णयानंतर कसोटी क्रिकेटमधील आणखी एका क्षणाची आठवण झाली. 1998 साली पेशावरमध्ये ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलरने 334 धावा करून ऑस्ट्रेलियाचे दिवंगत सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरण्यापासून टेलरला केवळ एका धावेची जरूरी असताना त्याने या कसोटीतील तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वीच डावाची घोषणा केली होती.









