ब्राझीलच्या राष्ट्रपतींशी द्विपक्षीय चर्चा : आज नामिबिया दौऱ्यावर पोहोचणार
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रिओ डी जानेरोहून ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाला पोहोचले. येथे शिव तांडव स्तोत्र आणि भारतीय शास्त्राrय नृत्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. येथे दाखल झाल्यानंतर मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांच्याशी व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, शेती आणि आरोग्य यासह अनेक मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा केली.
भारतीय पंतप्रधान 2 जुलै ते 10 जुलै दरम्यान 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. आतापर्यंत त्यांनी घाना, त्रिनिदाद अँड टोबॅगो, अर्जेंटिना येथे भेट दिली आहे. सध्या ते ब्राझीलच्या दौऱ्यावर असून तेथून नामिबियाला जातील. मंगळवारी पंतप्रधान ब्राझीलची राजधानी ब्राझिलियामध्ये पोहोचल्यानंतर विमानतळावर ब्राझीलचे संरक्षणमंत्री जोस मुसिओ मोंटेरो फिल्हो यांनी स्वागत केले. यावेळी पारंपारिक ब्राझिलियन सांबा रेगे नृत्य आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक ‘शिव तांडव’ यांचे आकर्षक सादरीकरण देखील करण्यात आले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या कलाकारांनी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ पारंपारिक सांबा रेगे नृत्याचा एक नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरही त्याचे कौतुक केले. हे सादरीकरण ब्राझीलच्या समृद्ध वारशाचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रिओ डी जानेरो येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर ब्राझिलियाला पोहोचले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती शेअर करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारत आणि ब्राझीलमधील संबंध मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे स्पष्ट केले आहे.









