आधुनिक समाजात गुन्हेगारांना शिक्षा देण्याची पद्धत बऱ्याचअंशी मानवीय झाली आहे. परंतु कायमस्वरुपी असे नव्हते. राजांचा जुलूम आणि शिक्षा देण्याच्या पद्धतींवर अनेक किस्से प्रचलित असून याचे ऐतिहासिक पुरावे देखील आहेत. जुन्या काळात अनेक राजवटींमध्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्याच्या काही पद्धती अत्यंत जुलुमी होत्या. अलिकडेच पुरातत्व तज्ञांना उत्खनात एका महिलेचा सांगाडा मिळाला आहे. या महिलेला चाकाला बांधून अत्यंत क्रूरपद्धतीने यातना देत मृत्युदंड देण्यात आला होता. मिलान विद्यापीठाच्या वैज्ञानिकांचे जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित अध्ययन या शोधाविषयी विस्तृत माहिती देणारे आहे. संशोधकांना मध्ययुगातील एका व्यक्तीची हाडं मिळाली असून याद्वारे त्या काळात कुख्यात अन् क्रूरपद्धतीने यातना देण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता, असे कळते. या व्यक्तीचे शीर यातनांसोबत वेगळ्या प्रकारे धडावेगळे करण्यात आले होते.
13 व्या शतकातील हा युवक 17-20 वर्षांच्या वयादरम्यानच मारला गेला होता. इटलीच्या उत्तर भागात मिलानमध्ये एका चर्चनजीक याला दफन करण्यात आले होते. त्याच्या हाडांच्या तपासणीतून त्याला ठिकठिकाणी ईजा झाली होती असे आढळून आले. तसेच या ईजा जाणूनबुजून पोहोचविलेल्या असल्याचे स्पष्ट झाले.
सार्वजनिक मृत्युदंडाची पद्धत
ही क्रूर पद्धत पूर्ण युरोपमध्ये सार्वजनिक मृत्युदंडासाठी प्रचलित होती. आधुनिक युगाच्या सुरुवातीला म्हणजेच 1500 च्या आसपासपर्यंत ही पद्धत वापरात होती. या पद्धतीत ठिकाण अन् वेळेनुसार बदलही झाले होते. तरीही यात हाडांना अत्यंत व्यवस्थित पद्धतीने तोडले जात होते, तसेच चाकांमुळे यातील त्रास वाढत होता.
चाकाचा व्हायचा वापर
संबंधित व्यक्तीला चाकामुळे प्रचंड वेदना सहन कराव्या लागायच्या, या चाकाला ब्रेकिंग व्हील किंवा कॅथरीन व्हील देखील मानले जाते. अनेक ठिकाणी यातना देणारे लोक पीडितांच्या अवयवांवर मोठे लाकडी चाक पाडून याची सुरुवात करायचे. हे चाक पायांच्या हाडापासून सुरू होत हळूहळू वर नेले जायचे. एकदा शरीर पूर्णपणे तुटून पडल्यावर तुटलेल्या अवयवांना चाकांशी बांधले जात होते.
मरण्यासाठी सोडून द्यायचे
यानंतर ब्लेड, आग, चाबुक किंवा तप्त चिमट्याचा वापर करून आणखी ईजा पोहोचविली जायची. मग चाकाला एका स्तंभावर लटकविले जायचे आणि एका बॅनरप्रमाणे प्रदर्शित केले जात होते. मृत्यू नजीक आलेल्या इसमाला अनेक दिवस किंवा आठवड्यापर्यंत लटकविले जायचे. अशाप्रकारे तो तेथेच मरून जायचा. अनेकदा त्याच्यावर दया दाखवत त्याला मारून टाकले जायचे. ही क्रूर यातना पद्धत सर्वसाधारणपणे गंभीर गुन्हेगारांच्या विरोधात वापरली जायची. उत्तर इटलीत अशाप्रकारच्या यातना सर्वसाधारणपणे प्लेग फैलाविणाऱ्या संशयास्पद व्यक्तींसाठी वापरात होती.









