सांगली :
वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. वारणा धरणाचा पाणीसाठा २८.२३ टीएमसी झाला असून सलग दुसऱ्या दिवशी सोमवारीही चार हजार पाचशे क्युसेकने विसर्ग सुरु आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली.
जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासात ६३ मिलीमीटर पाऊस झाला. धरणात सायंकाळी २८.२३ टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी इतकी आहे. चांदोलीचे चारही दरवाजे उघडले असून ४ हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरु आहे. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. धरणात ६९.०५ टीएमसी पाणीसाठा झाला असून एक हजार ५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी सायंकाळी १८.६ फुटांवर पोहोचली. कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा पाणीसाठा ८८.२५ टीएमसी झाला आहे. धरणात पाण्याची आवक एक लाख १० हजार क्युसेकने होत असून १ लाख ११ हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. शिराळा तालुक्यात बहुतांशी भागात पावसाचा जोर राहिला. वाळवा, पलूस तालुक्यात दुपारी मध्यम पाऊस झाला. मिरज, तासगाव तालुक्यात पावसाची रिमझिम सुरु होती. पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यात पेरण्यांना गती आल्याचे चित्र होते.
- शिराळा तालुक्यात सर्वाधिक २७.६ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक २७.६ मि.मी. पाऊस झाला. गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २.४ (१३०.५), जत ०.२ (९३), खानापूर-विटा २.९ (१०१.९), वाळवा-इस्लामपूर ६.३ (२३२.५), तासगाव ४.७ (१२४.६), शिराळा २७.६ (५८९.५), आटपाडी ०.९ (९३.८), कवठेमहांकाळ २.२ (१०५.६), पलूस ३.८ (१८९.९), कडेगाव ३.२ (१५५)








