जागेची आमदार-अधिकाऱ्यांकडून पाहणी : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी निर्णय
बेळगाव : बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत फ्लॉयओव्हर ब्रिज उभारला जाणार आहे. यासंदर्भातील जागेची पाहणी सोमवारी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ व इतर अधिकाऱ्यांनी केली. लेकव्ह्यू हॉस्पिटल जंक्शन, अशोक सर्कल, राणी चन्नमा चौक या परिसराची त्यांनी पाहणी केली. या ठिकाणी बांधकाम करताना सुरक्षितरित्या वाहतूक सुरू राहावी, तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंते, पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही पाहणी केली.
लवकरच कामाला प्रारंभ
बांधकामाला सुरुवात झाल्यास वाहतूक वळविण्यासंदर्भात चर्चा झाली. नागरिकांची सुरक्षितता, आपत्कालीन मार्ग तसेच वाहन चालकांचा गोंधळ होऊ नये यासाठी फलक उभारून सूचना करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. लवकरच फ्लाय ओव्हर ब्रिजचे बांधकाम सुरू करण्यासंदर्भात आमदारांनी पाहणी केली.









