भारतीय संघाने पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंड संघाला पहले ‘आप’ म्हणत कसोटी सामना बहाल केला होता. परंतु काल मात्र शुभमन गिलच्या भारतीय चमूने पूर्ण पाच दिवस पहिले ‘हम’ म्हणत सामना अगदी लीलया खिशात घातला. पूर्ण सामन्यात भारतीय संघ मैदानात वाघासारखा वावरला हे विशेष.
भारतीय संघाची टूर जेव्हा इंग्लंडला निघाली त्यावेळी बऱ्याच जणांनी कर्णधारपदाच्या निमित्ताने शुभमन गिलच्या नावाने बोटं मोडली होती. परंतु गंमत बघा, क्रिकेट नावाचा खेळ कधी कोणाला रावाचा रंक आणि रंकाचा राव बनवेल हे सांगता येत नाही. इंग्लंड टूर हे त्याचंच मूर्तिमंत उदाहरण. शुभमन गिलने खऱ्या अर्थाने भल्याभल्या क्रिकेट विश्लेषकांना तोंडघशी पाडलंय. तेही रोहित आणि विराटने कसोटी क्रिकेटसाठी भारतीय संघाला शेवटचं ‘जय हिंदुस्थान’ म्हटल्यानंतर. सचिन तेंडुलकर यांच्या 101 व्या सामन्यानिमित्त ज्येष्ठ क्रिकेट समालोचक आणि महाराष्ट्र टाइम्सचे क्रीडा पत्रकार चंद्रशेखर संत यांनी मला वानखेडे स्टेडियमच्या प्रेस बॉक्समध्ये नेलं होतं. त्यावेळी एका वार्तालापात ज्येष्ठ क्रिकेट स्तंभलेखक स्वर्गीय द्वारकानाथ संझगिरी म्हणाले होते की, इंग्लंडमधील युवती आणि तेथील हवामान यांच्यावर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका. एकतर ते तुमच्या प्रेमात पडतील किंवा तुमचा विश्वासघात करतील. विशेषत: इंग्लंडमधील वातावरण कधीही बदलू शकते. यात खरा कस लागतो तो फलंदाजांचा. यात मात्र भारतीय फलंदाज प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले.
शुभमन गिलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. ज्यावेळी तुम्ही परदेशात धावा जमवता, त्यावेळी प्रत्येक धाव ही 24 कॅरेट सोन्यासारखी असते. विशेषत: इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्ये त्या धावांचे महत्त्व काही वेगळंच असतं. ज्याच्या नावावर परदेशात एकही शतक नव्हतं त्याच शुभमन गिलने इंग्लिश भूमीत एका कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. अक्षरश: शतकांचा रतीब टाकला. त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेले कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह डोळ्याचे पारणे फेडणारे होते. या सर्व गोष्टी क्रिकेटच्या माहेरघर असणाऱ्या इंग्लंडमध्ये. ही गोष्ट खरोखर विस्मयचकित करणारी होती. परंतु हे सर्व फक्त क्रिकेटमध्येच घडू शकतं हेही तेवढंच खरं! वयाच्या पंचविसाव्या वर्षी कप्तानपदाचं ओझं घेत आपलं नाणं किती खणखणीत आहे हे शुभमन गिलने दाखवून दिलं.
राजकारणात भर पावसात भिजल्यानंतर काय होऊ शकतं हे सर्वश्रुत आहे. परंतु क्रिकेटमध्ये भर पावसात प्रॅक्टिस मॅच न सोडता फलंदाजी करत राहिलेल्या शुभमन गिलला खऱ्या अर्थाने पारखलं ते भारताचे मध्यमगती गोलंदाज ‘कर्सन घावरी’ यांनी. परदेशात जिथे भारतीय फलंदाज मागील काही वर्षात चाचपडत खेळत असताना गिलने ओळीने तीन शतकं ठोकत इंग्लंडच्या भूमीत साक्षात क्रिकेटरुपी विठ्ठलाचे दर्शन घडवलं. काल महाराष्ट्रात आषाढी एकादशीच्या रूपाने लाखो भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. परंतु दुसऱ्या कसोटीत इंग्लिश भूमीत भारतीय समर्थकांनी शुभमन गिलच्या रुपात क्रिकेटरूपी विठ्ठलाचे दर्शन घेतलं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या कसोटीतील कमतरता दुसऱ्या कसोटीत भरून काढली. तेही जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत. सर्व कसं स्वप्नवत होतं. परंतु हे वास्तव होतं हेही तेवढंच खरं. दुसऱ्या कसोटीतील विजयाने पहिला कसोटीतील पराभव हा फ्लूक होता हे सिद्ध झालं.
मी मागील तीस वर्षे भारतीय क्रिकेट फार जवळून बघतोय. 1980 च्या दशकात सुनील गावसकर निवृत्त झाल्यानंतर कोण? हा प्रश्न तमाम भारतीयांना पडला होता. त्याचे उत्तर आपल्याला सचिन तेंडुलकरच्या रूपात मिळालं. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर विराट कोहलीच्या रूपात आपल्याला उत्तर मिळालं. आणि आता कोहलीचा वारसा शुभमन गिल भविष्यात पुढे नेईल, अशीच आपण अपेक्षा करूया. थोडक्यात इंग्लिश भूमित दुस्रया कसोटीतील नेत्रदीपक विजयानंतर आता थांबायचं नाही एवढं मात्र खरं!
विजय बागायतकर









