वृत्तसंस्था / कोलंबो
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने लंकेचा 16 धावांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या दुसऱ्या सामन्यात 39 धावात 5 गडी बाद करणाऱ्या बांगलादेशच्या तन्वीर इस्लामला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेतील पहिला सामना यजमान लंकेने जिंकला होता. या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. बांगलादेशचा डाव 45.5 षटकात 248 धावात आटोपला. त्यानंतर लंकेचा डाव 48.5 षटकात 232 धावात संपुष्टात आल्याने बांगलादेशने हा सामना 16 धावांनी जिंकला.
बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या परवेझ हुसेन इमॉनने 69 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 67 तर रिदॉयने 69 चेंडूत 2 चौकारांसह 51, टी हसन शकीबने 21 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 33, जाकर अल्लीने 2 चौकारांसह 24, शमीम हुसेनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22, शांतोने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 6 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 35 धावात 4 तर हसरंगाने 60 धावात 3, चमीरा, असालेंका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावामध्ये कुशल मेंडीसने 31 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 56, कमिंदू मेंडीसने 51 चेंडूत 2 चौकारांसह 33, मधूसेकाने 3 चौकारांसह 17, लियानगेने 85 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 78 धावा जमविल्या. हसरंगा आणि चमिरा यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. बांगलादेशच्या अचुक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 48.5 षटकात 232 धावांवर आटोपला. लंकेच्या डावामध्ये 3 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे तन्वीर इस्लामने 39 धावात 5 तर शकीबने 34 धावात 2, मुस्ताफिजुर रेहमान, मेहदी हसन मिराज आणि शमीम हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 45.5 षटकात सर्वबाद 248 (इमॉन 67, रिदॉय 51, टी. हसन शकीब 33, जाकर अल्ली 24, शमीम हुसेन 22, असिता फर्नांडो 4-35, हसरंगा 3-60, चमिरा, असालेंका प्रत्येकी 1 बळी), लंका : 48.5 षटकात सर्वबाद 232 (लियानगे 78, कुशल मेंडीस 56, कमिंदू मेंडीस 33, टी. इस्लाम 5-39, शकीब 2-34, रेहमान, मिराज आणि शमीम हुसेन प्रत्येकी 1 बळी).









