दलाई लामांच्या जन्मदिन सोहळ्याला केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती : चीनकडून भारताला सल्ला
वृत्तसंस्था/ बीजिंग
तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांना 90 व्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी शुभेच्छा दिल्या होत्या. दलाई लामा हे प्रेम, करुणा, धैर्य आणि नैतिक शिस्तपालनाचे स्थायी प्रतीक राहिले असल्याचे मोदींनी स्वत:च्या शुभेच्छा संदेशात म्हटले होते. मोदींच्या या संदेशानंतर चीनचा जळफळाट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दलाई लामांना त्यांच्या 90 व्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देणे आणि त्यांच्या जन्मदिन सोहळ्यात भारतीय अधिकारी सामील होण्याच्या मुद्द्यावर भारतासमक्ष विरोध नोंदविला असल्याचे चीनने सोमवारी म्हटले आहे.
भारताने तिबेटशी संबधित मुद्द्यांवरील संवेदनशीलता पूर्णपणे समजून घ्यावी आणि फुटिरवादी वृत्तीची ओळख करून घ्यावी. तिबेटशी संबंधित प्रकरणांवर चीनची स्थिती सुसंगत आणि स्पष्ट आहे आणि ती सर्वांना माहित असल्याचा दावा चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सोमवारी केला.
14 वे दलाई लामा हे राजनयिक निर्वासनात असून ते दीर्घकाळापासून फुटिरवादी कारवायांमध्ये लिप्त राहिले आहेत. तसेच धर्माच्या आड शिजांगला चीनपासून वेगळा करण्याचा प्रयत्न करत राहिले असल्याचा आरोप माओ निंग यांनी केला. चीन तिबेटला शिजांग असे संबोधितो.
भारताने शिजांगशी संबंधित मुद्द्यांची संवेदनशीलता पूर्णपणे समजून घ्यावी तसेच 14 व्या दलाई लामांच्या फुटिरवादी प्रवृत्तीला ओळखावे आणि शिजांगशी संबंधित मुद्द्यांवर चीनबद्दलच्या स्वत:च्या प्रतिबद्धतेचा सन्मान करावा असे माओ निंग यांनी म्हटले आहे.
चीनने नोंदविली हरकत
भारताने विवेकपूर्ण पद्धतीने काम करावे आणि बोलावे, या मुद्द्याचा वापर चीनच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करण्यासठी केला जाऊ नये. याप्रकरणी चीनने भारतासमोर स्वत:ची हरकत नेंदविली असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. दलाई लामा यांच्या जन्मदिनाच्या सोहळ्यात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि राजीव रंजन सिंह, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सिक्कीमचे मंत्री सोनम लामा हे सामील झाले होते.
एका आठवड्यात दुसऱ्यांदा चिडला चीन
चीनने दलाई लामा यांच्याशी निगडित प्रकरणी भारताचे पाऊल आणि टिप्पणींवर एका आठवड्यात दुसऱ्यांदा टीका केली आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार दलाई लामा आणि त्यांच्याकडून स्थापन ट्रस्टला असून यात त्रयस्थ पक्षाची कुठलीच भूमिका नसल्याचे वक्तव्य केले होते. रिजिजू यांचे हे वक्तव्य चीनला चांगलेच झोंबले होते. तर त्यापूर्वी दलाई लामा यांनी केवळ गादेन फोरडंग ट्रस्टच माझ्या उत्तराधिकाऱ्याची पुष्टी करू शकते असे स्पष्ट केले होते. तर चीनने दलाई लामांचा हा दावा फेटाळत चिनी परंपरेनुसार पुढील दलाई लामाची निवड होईल असे म्हटले होते.









