इंग्लंडच्या ज्या मैदानात आतापर्यंत भारताला एकही विजय मिळाला नव्हता त्या बर्मिंगहॅम येथील एजबेस्टनच्या मैदानात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय संघाने 336 धावांनी इंग्लंडला पराभूत करत विदेशातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. एवढेच नाही भारतीय संघ एजबेस्टनच्या मैदानात कसोटी जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. भारतीय क्रिकेटचा इंग्लंडमधील ऐतिहासिक प्रवास आणि एजबेस्टनच्या विजयापर्यंत आपण मारलेली मजल ही भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात मानली पाहिजे. मुळातच भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंडमधील प्रवास हा साहस, आव्हाने आणि अविस्मरणीय विजयांनी भरलेला आहे. 1932 मध्ये
लॉर्डसच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने, कर्नल सी. के. नायडू यांच्या नेतृत्वाखाली, जागतिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांनी भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले. पण
बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदान हे भारतीय संघासाठी नेहमीच एक कोडं राहिलं. रविवारी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या मैदानावर पहिल्यांदा कसोटी विजय मिळवत इतिहास रचला. हा विजय विदेशातील सर्वात मोठा धावांनी मिळवलेला विजय ठरला आणि भारत एजबेस्टनवर कसोटी जिंकणारा पहिला आशियाई संघ बनला.भारतीय क्रिकेट संघाने 1932 मध्ये कर्नल सी. के. नायडू यांच्या नेतृत्वाखाली
लॉर्ड्सवर पहिला कसोटी सामना खेळला. हा सामना जरी पराभवाने संपला, तरी भारतीय क्रिकेटच्या जागतिक प्रवासाला सुरुवात झाली. 1952 मध्ये मद्रास येथे इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवताना विनू मांकड यांनी 12 विकेट्स घेत इतिहास रचला. पण इंग्लंडच्या धरतीवर पहिला कसोटी विजय मिळवण्यासाठी भारताला 1971 पर्यंत वाट पाहावी लागली. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ओव्हल येथे इंग्लंडला पराभूत करत मालिका 1-0 ने जिंकली. भगवत चंद्रशेखर यांच्या फिरकी गोलंदाजीने या विजयात मोलाची भूमिका बजावली. इंग्लंडमधील भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक सामने चाहत्यांच्या मनात कायमचे कोरले गेले आहेत. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजला लॉर्ड्सवर पराभूत करत पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला, ज्याने भारतीय क्रिकेटच्या सुवर्णयुगाला सुरुवात झाली! त्यादृष्टीने रविवारचा विजय म्हणजे भारताच्या हिरक युगाची सुरुवात म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही! 1986 मध्ये कपिल देव यांच्याच नेतृत्वाखाली भारताने लॉर्ड्स आणि लीड्स येथे कसोटी सामने जिंकत मालिका 2-0 ने खिशात घातली. दिलीप वेंगसरकर यांच्या दोन शतकांनी आणि कपिलच्या अष्टपैलू कामगिरीने भारताला यश मिळवून दिले. 2000 च्या दशकात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये यशस्वी पुनरागमन केले. 2002 मध्ये लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर भारताने 685 धावांचा डोंगर उभारला. राहुल द्रविड (148), सचिन तेंडुलकर (193) आणि सौरव गांगुली (128) यांच्या शतकांनी हा सामना अनिर्णित राखला. याच मालिकेतील नेटवेस्ट मालिकेचा अंतिम सामना
लॉर्ड्सवर खेळला गेला, जिथे युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी 326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताला विजय मिळवून दिला. गांगुलीचा लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून केलेला जल्लोष आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज येथे कसोटी विजय मिळवला. झहीर खानच्या गोलंदाजी आणि द्रविडच्या शतकाने मालिकेत आघाडी मिळवली. 2014 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने लॉर्ड्सवर इशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. 2018 आणि 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने लॉर्ड्स, ओव्हल आणि ट्रेंट ब्रिज येथे विजय मिळवत आपली ताकद दाखवली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि के.एल. राहुल यांची कामगिरी या सामन्यांमध्ये उल्लेखनीय होती. 2022 मध्ये जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने 557 धावांचा पाठलाग करताना जो रूट आणि
जॉनी बेअरस्टो यांच्या शतकांमुळे पराभव पत्करावा लागला. या पराभवांनी एजबेस्टन भारतीय संघासाठी अभेद्य किल्ला बनला होता. रविवार 6 जुलै 2025 रोजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एजबेस्टनवर इतिहास रचलाच! अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला 336 धावांनी पराभूत केले. हा विजय भारतीय क्रिकेटसाठी अनेक कारणांनी खास आहे. एकतर एजबेस्टनवर 58 वर्षांच्या पराभवाच्या मालिकेला पूर्णविराम मिळाला. भारताने एका कसोटी सामन्यात 1000 हून अधिक धावा उभारण्याचा विक्रम केला. शुभमन गिलने आपल्या नेतृत्वाखाली आणि फलंदाजीने भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात केली. या विजयाने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आणि भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवला. कर्नल सी. के. नायडू यांच्यापासून ते शुभमन गिलपर्यंतचा प्रवास असा सुफळ संपूर्ण झाला! लॉर्ड्स, ओव्हल, ट्रेंट ब्रिज आणि हेडिंग्ले येथील विजयांनी भारताची ताकद दाखवली, पण एजबेस्टनचा विजय हा एक मैलाचा दगड आहे. हा विजय भारतीय क्रिकेटच्या धैर्य, चिकाटी आणि नव्या पिढीच्या क्षमतेचा पुरावा आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नव्या उंचीवर पोहोचत आहे, आणि एजबेस्टनचा हा विजय त्याच्या उज्ज्वल भविष्याचा साक्षीदार आहे. तसे सुवर्ण युगातून हिरक युगाकडे वाटचाल सुरू झाल्याचेही हे निदर्शक आहे…!!!








