सेन्सेक्स 9 अंकांनी तेजीत : आयटी निर्देशांक दबावात बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक सपाट स्तरावरती बंद झाले. सोमवारी एफएमसीजी क्षेत्राच्या निर्देशांकाने चांगली कामगिरी केली होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 9 अंकांनी वाढत 83,442 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 25,461 च्या स्तरावर 0.30 अंकांनी वाढत बंद झाला होता. निफ्टी बँक निर्देशांक 82 अंकांनी घसरत 56,949 च्या स्तरावर बंद झाला तर आयटी निर्देशांक देखील 299 अंकांनी घसरत 38,866 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग घसरणीत राहिले होते. निफ्टीमधील 50 समभागांपैकी 28 समभाग घसरणीसोबत बंद झाले. हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, आयटीसी, टाटा कंझ्युमर, जिओ फायनान्शिअल, आयशर मोटर्स यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. दुसरीकडे घसरणीमध्ये पाहता बीइएल, टेक महिंद्रा, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, एचसीएल टेक, इटरनल, पारस डिफेन्स, गार्डन रिच शिप बिल्डर्स, माझगाव डॉक यांचे समभाग घसरणीत राहिले होते. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता ऑटो, कमोडिटी, सीपीएससी, फायनान्शियल, आयटी, मेटल आणि फार्मा हे निर्देशांक घसरणीत होते. दुसरीकडे एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा, रिअल्टी व ऑइल व गॅस या क्षेत्रांचे निर्देशांक मजबुतीसोबत बंद झाले.
आशियाई बाजारामध्ये पाहता जपानचा निक्केई घसरणीसोबत बंद झाला. कोरियाचा कोस्पीसुद्धा 0.17 टक्के घसरणीसह बंद झाला. अमेरिकेतील बाजार बंद होते. चार जुलै रोजी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 1029 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले आहेत. याच दरम्यान विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश सेगमेंटमध्ये 760 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत.









