पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप : केरळ सरकारने उचलला होता खर्च
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
हरियाणातील युट्युबर ज्योती मल्होत्रावरून नवा खुलासा झाला आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी तुरुंगात असलेली ज्योती यापूर्वी केरळ सरकारच्या अधिकृत मोहिमेत सामील होती असे समोर आले आहे. स्वत:चे युट्यूब चॅनेल ‘ट्रॅव्हल विथ जो’साठी ओळखल्या जाणाऱ्या ज्योतीची निवड केरळ सरकारने केली होती. केरळला जागतिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी मिळवून देणे हे ज्योतीचे काम होते.
ज्योतीसोबत केरळ सरकारने भागीदारी केली होती. राज्य सरकारने तिचा प्रवास अन् वास्तव्याचा खर्च उचलला होता. 2024-25 दरम्यान ज्योती केरळच्या विविध ठिकाणी गेली होती. यात कन्नूर, कोझिकोड, कोची, अलापुझा आणि मुन्नार सामील आहे. परंतु पाकिस्तानकरता हेरगिरी केल्याच्या आरोपांमुळे ज्योतीच्या केरळमधील प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होती असाही आरोप आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संबंध
भारतातील पाकिस्तानी उच्चायोगाच्या अधिकाऱ्यांच्या ती संपर्कात होती. ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा खुलासा झाल्यावर उच्चायोगातील पाकिस्तानी अधिकाऱ्याला देश सोडावा लागला. ज्योतीच्या अटकेनंतर देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. यादरम्यान एकूण 12 संशयितांना अटक झाली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि इन्फ्लुएंसर नेटवर्कचा वापर गोपनीय माहिती जमविण्यासाठी हे सर्व आरोपी करत होते.
राज्य सरकारचे स्पष्टीकरण
केरळमधील डाव्या आघाडीचे सरकार आणि त्याचे मंत्री कधीच जाणूनबुजून हेरांना राज्यात आमंत्रित करत सर्व सुविधा प्रदान करणार नाही. आमच्यावर केले जाणारे आरोप खोटे आहेत. आम्ही अशाप्रकारच्या दुष्प्रचाराला कुठलेच महत्त्व देत नाही, कारण जनता आमच्यासोबत आहे, असे वक्तव्य केरळचे पर्यटनंमत्री पी.ए. मोहम्मद रियास यांनी केले आहे. रियास हे राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे जावई आहेत.









