प्रशांत किशोर यांनी प्रदान केले सदस्यत्व
वृत्तसंस्था/ पाटणा
बहुचर्चित युट्यूबर मनीष कश्यपने प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात प्रवेश केला आहे. मनीष कश्यपने सोमवारी जनसुराज पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. बिहारमध्ये व्यवस्था परिवर्तनाची इच्छा बाळगणाऱ्या सर्व लोकांनी एकत्र यायला हवे, असे उद्गार प्रशांत किशोर यांनी काढले आहेत. यावेळी होणारी निवडणूक बिहारचे भाग्य ठरविणारी आहे. बिहारची वस्तुस्थिती सर्वांना माहित आहे, राज्यात कुणीच सुरक्षित नाही, बिहारला सुरक्षित करायचे असल्यास जनसुराज सरकार सत्तेवर येणे आवश्यक असल्याचे कश्यपने म्हटले.
बिहारमधील 2020 च्या निवडणुकीत कश्यपने चनपटिया मतदारसंघात अपक्ष म्हणून भाग घेतला होता, या मतदारसंघात भाजपचे उमाशंकर सिंह विजयी झाले होते. यावेळीही मनीष कश्यप हा चनपटिया मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तर जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व 243 जागांवर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच केली आहे.
मनीष कश्यप अनेक प्रकरणांमुळे वादातही सापडला आहे. अलिकडेच डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी तो वादग्रस्त ठरला होता. यापूर्वी सारण जिल्हा प्रशासनाने 11 युट्यूब चॅनेल्सवर एफआयआर नोंदविला होता, ज्यात मनीष कश्यपचे चॅनेल देखील सामील होते. यापूर्वी मनीषला तामिळनाडू पोलिसांनी अटक केली होती. 9 महिन्यांनी त्याची तुरुंगातून मुक्तता झाली होती.









