बेळगाव : शनिवार दि. 5 पासून सुरू झालेल्या पुनर्वसु नक्षत्राने सुरुवातीलाच जोरदार सलामी दिली आहे. शनिवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. अधूनमधून पाऊस उघडीप देत असला तरी हवेत मात्र गारठा कायम आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शुक्रवार दि. 4 रोजी आर्द्रा नक्षत्राची सांगता झाली. तर शनिवारपासून पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात झाली आहे. ते नक्षत्र 18 जुलैपर्यंत असणार असून 19 जुलैपासून पुष्य नक्षत्राला सुरुवात होणार आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने मान्सूनला सुरुवात होण्यापूर्वीच जिल्ह्यातील नदी, नाले प्रवाहित झाले. महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी परिसरातील 18 बंधारे पाण्याखाली जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
त्याचबरोबर शहराला पाणीपुरवठा करणारा राकसकोप जलाशय तुडुंब भरला असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी जलाशयाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे शेतवडीत पाणी तुंबल्याने काही ठिकाणी भातासह इतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भात रोप लागवडीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पुढील आठवड्यापासून रोप लागवडीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाऊस अधूनमधून उघडीप देत असल्यामुळे काही प्रमाणात शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र पावसाला सुरुवात झाल्यास बराच उशिर पावसाच्या सरी कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांश जण कडधान्य खरेदीवर भर देत आहेत. धूळवाफ पेरणी केलेल्या भातपिकाला कोळपणी करण्यासाठी हंगाम न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात शेतवडीत तण वाढले आहे. त्यामुळे तण काढण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे.









