वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सैन्य पश्चिम भागात आपली लढाऊ क्षमता वाढवण्यावर सतत लक्ष केंद्रित करत आहे. याचदरम्यान, अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. भारताला या महिन्यात अमेरिकेकडून अपाचे हेलिकॉप्टरची पहिली खेप मिळू शकेल अशी अपेक्षा आहे. भारत गेल्या 15 महिन्यांपासून या हेलिकॉप्टरची प्रतीक्षा करत होता. परंतु, अखेर त्यांची प्राप्ती लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. पश्चिम सीमेवर ते तैनात करण्याचे नियोजन आहे. मार्च 2024 मध्ये आर्मी एव्हिएशन कॉर्प्सने जोधपूरमध्ये अपाचे स्क्वॉड्रनची स्थापना केली होती. परंतु, त्याची स्थापना होऊनही स्क्वॉड्रनकडे 15 महिने अपाचे हेलिकॉप्टर नव्हते.









