प्रादेशिक आयुक्तांचा निर्णय : कारण गुलदस्त्यात, पुढील तारीखही नाही
बेळगाव : महानगरपालिकेच्या चार स्थायी समित्यांसाठी बुधवार दि. 2 रोजी निवडणूक होणार होती. त्यामुळे कौन्सिल विभागाकडून निवडणुकीची सर्व तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र मंगळवारी सकाळी अचानक निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून महापालिकेला कळविण्यात आली. पण निवडणूक पुढे ढकलण्याचे कारण सांगण्यात आले नसून पुढील तारीखही निश्चित करण्यात आलेली नाही. नियोजित निवडणूक रद्द करण्यात आल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.
महानगरपालिकेच्या चारही स्थायी समित्यांसाठी 2 जुलै रोजी निवडणूक घेण्याची अधिसूचना 20 जून रोजी प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टेण्णावर यांनी जारी केली होती. निवडणुकीचे वेळापत्रकही महापालिकेला देण्यात आल्याने कौन्सिल विभागाकडून निवडणुकीची सर्व तयारी करण्यात आली होती. त्यातच महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव हे अपात्र ठरल्याने पुन्हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
कौन्सिल विभागाकडून यापूर्वीच मतदारांची यादी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली होती. त्यामध्ये 58 नगरसेवक आणि 7 पदसिद्ध सदस्य अशा एकूण 65 जणांचा समावेश होता. मात्र दोन नगरसेवक अपात्र ठरल्याने तातडीने कौन्सिल विभागाकडून सोमवारीच सुधारित 63 जणांची मतदार यादी पुन्हा प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली. दोघेजण अपात्र ठरले असले तरी निवडणूक होणार हे निश्चित होते. त्यामुळे कौन्सिल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवार, रविवार सुटीच्यादिवशीही महापालिकेत जाऊन निवडणुकीसंबंधी सर्व तयारी पूर्ण केली होती.
बुधवारी निवडणूक होणार असल्याचे गृहीत धरून कौन्सिल विभागातील कर्मचारी नेहमीप्रमाणे महापालिकेत दाखल झाले. मात्र 11 च्या दरम्यान प्रादेशिक आयुक्त कार्यालयातून कौन्सिल विभागाला फोन आला व त्यांना तातडीने प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे येण्यास सांगितले. कौन्सिलच्या व्यवस्थापक प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे गेल्यानंतर बुधवारची स्थायी समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसा लेखी आदेशही देण्यात आला. मात्र त्यामध्ये निवडणूक पुढे ढकलण्याचे कारण व पुढील तारीख नमूद करण्यात आली नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचे कारण काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला असून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.









