जिल्हा पोक्सो न्यायालयाचा निकाल : प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड
बेळगाव : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिचे मोटारसायकलवरून अपहरण करणाऱ्या दोघांना पोक्सो न्यायालयाने 5 वर्षांचा कठोर कारावास आणि प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंगळवार दि. 1 रोजी पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी हा निकाल दिला असून लक्ष्मण भीमाप्पा मादर उर्फ गज्जीनमनी, सोमलिंगप्पा उर्फ सोमप्पा फकिरप्पा मादर उर्फ गज्जीनमनी दोघेही राहणार कोळ्ळूर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
आरोपी व अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांमध्ये ग्राम पंचायत निवडणूक काळात वैमनस्य निर्माण झाले होते. याच कारणातून वरील दोघांनी मुलीला चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी हुलकुंद बसस्थानकावर बसच्या प्रतीक्षेत थांबली होती. त्यावेळी वरील दोघेजण मोटारसायकलवरून पाठीमागून तिच्याजवळ आले. कोठे जात आहेस? अशी विचारणा मुलीला केल्यानंतर तिने घरी जात असल्याचे सांगितले. आम्ही तुला घरी सोडतो, असे सांगितल्यानंतर मुलीने नकार देत बसने येते असे उत्तर दिले.
त्यावेळी आरोपी लक्ष्मणने आपल्या खिशातील चाकू काढून तिला धमकी देत आपल्या मोटारसायकलवर बस अशी धमकी दिली. मुलीने मी येत नाही, असे म्हटल्याने आरोपीने तिचा हात पकडून तिला मोटारसायकलवर बसविले. दुसरा आरोपी सोमलिंगप्पा हा मोटारसायकल चालवित होता. मोटारसायकलवर मुलीला बसवून घेऊन ते सालहळ्ळी गावाकडे निघाले. सालहळ्ळीतील बसस्थानकाजवळ मोटारसायकल थांबविण्यात आल्यानंतर मुलीने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पलायन केले. त्यामुळे याप्रकरणी कटकोळ पोलीस स्थानकात मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
या प्रकरणाचा तपास करून पोक्सो न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आला. या खटल्यात 8 साक्षी, 34 कागदोपत्री पुरावे आणि एक मुद्देमाल तपासण्यात आला. दोघांवरही आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने दोघांना पाच वर्षांचा कठोर कारावास व प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच जिल्हा कायदा प्राधिकारणाकडून पीडित मुलीला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.









