‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल : प्रशासनाकडून पाणी काढण्याची गरज : वकील-नागरिकांना ये-जा करण्यासाठी होता मार्ग
बेळगाव : वकील व नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोट्यावधींचा निधी खर्च करून भुयारी मार्ग करण्यात आला आहे. मात्र वापराविना सदर भुयारी मार्ग आहे तसाच पडून आहे. परिणामी मुसळधार पावसामुळे भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात उसंत दिली असली असली तरी मार्गावरील पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही. कोणी भुयारी मार्गावर गेल्यास धोका उद्भवू नये यासाठी एचईआरएफ रेस्क्यू पथकाने दोन्ही बाजू सुरक्षा टेप लावून बंद केल्या आहेत. विशेष म्हणजे शुक्रवार दि. 25 रोजी दैनिक ‘तरुण भारत’ने भुयारी मागाला स्विमिंग पूलचे स्वरुप या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन मार्ग करण्यात आल्याने कौतुक होत आहे.
काही दिवसांपासून शहर भागात मुसळधार पाऊस होत आहे. सकाळी उन्ह तर दिवसभरात हलक्या किंवा मुसळधार पाऊस होत आहे. तसेच पाऊस असल्याने काहीजण भुयारी मार्गावरून जाण्यासाठी येत होते. पण पाणी असल्याने त्यांना मुख्य रस्ता पार करून जावे लागले. अनोळखींना याची माहिती नसली आणि ते भुयारी मार्गावरून गेले असते तर धोका निर्माण झाला असता. यासाठी सदर मार्ग दोन्ही बाजूकडून बंद करण्याची आवश्यकता बनली होती. या परिसरात जिल्हाधिकारीसह विविध सरकारी कार्यालये कार्यान्वित असून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला न्यायालये व वकिलांची कार्यालये आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांची वर्दळ असते. पण संभाव्य धोका लक्षात घेऊन एचईआरएफ रेस्क्यू पथकाने दोन्ही बाजूकडून सुरक्षा टेपने मार्ग बंद केला असून धोका टळला आहे. मात्र प्रशासनाकडून भुयारी मार्गावरील पाणी काढण्याची आवश्यकता असून यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.









