नवारस्ता :
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत धरणात प्रतिसेकंद 25 हजार 496 क्युसेक पाण्याची आवक सुरू राहिली आहे. परिणामी धरणात झपाट्याने पाणीसाठा होत असल्याने रविवारी मध्यरात्रीच धरणाच्या पाणीसाठ्याने पन्नाशी ओलांडली.
दरम्यान, धरणाच्या इतिहासात अलिकडच्या दहा वर्षांत प्रथमच जूनमध्ये निम्मे धरण भरले असून, आता राज्यातील वीज आणि सिंचनाच्या प्रश्नाला यावर्षीही दिलासा मिळणार आहे
कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण तालुक्यात संपूर्ण जून महिन्यापासून पावसाची रिपरिप नव्हे, तर संततधार सुरू राहिली आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. अवघ्या महिन्याच्या कालावधीत धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणीसाठ्याने सोमवारी रात्री पन्नाशी ओलांडली आहे. जून महिन्यातच कोयना धरण निम्मे भरले भरल्याचे प्रथमच अनुभवयास मिळत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 20 दिवस अगोदरच कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने पन्नाशी गाठली. गतवर्षी 20 जुलै रोजी धरणाच्या पाणीसाठ्याने पन्नाशी ओलांडली होती. दरम्यान, राज्याची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण निम्मे भरल्याने राज्यातील वीज आणि सिंचनाच्या प्रश्नाला दिलासा मिळणार आहे.
- गेल्या आठ वर्षांतील पन्नाशी…
गेल्या सहा वर्षांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने सलग जुलै महिन्यातच पन्नाशी गाठली. मात्र 2025 मध्ये जून महिन्यातच पन्नाशी ओलांडल्याचे खालील आकडेवाडीवरून दिसून येते.
दिनांक 18 जुलै 2017 पाणीसाठा 52.56 टीएमसी
दिनांक 11 जुलै 2018 पाणीसाठा 51.00 टीएमसी
दिनांक 18 जुलै 2019 पाणीसाठा 50.00 टीएमसी
दिनांक 24 जुलै 2020 पाणीसाठा 50.11 टीएमसी
दिनांक 18 जुलै 2021 पाणीसाठा 50.61 टीएमसी
दिनांक 16 जुलै 2022 पाणीसाठा 53.53 टीएमसी
दिनांक 24 जुलै 2023 पाणीसाठा 53.69 टीएमसी
दिनांक 20 जुलै 2024 पाणीसाठा 52.15 टीएमसी
दिनांक 30 जून 2025 पाणीसाठा 52.08 टीएमसी
दरम्यान, धरणाच्या पाणीसाठ्यात पाण्याची आवक वाढू लागल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून पायथा विद्युतगृहातून कोयना नदीपात्रात 1050 क्युसेक विसर्ग अद्यापही सुरुच आहे.
- उरमोडी धरणातून विसर्ग सुरू
उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उरमोडी धरणामध्ये पाण्याची मोठी आवक वाढली आहे. उरमोडी धरणाच्या जलाशय परिचलन सूचीनुसार धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दि. 30 जून रोजी सकाळी 11.00 वाजता धरणाचे वक्र दरवाजातून उरमोडी नदी पात्रात 1500 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. जलविद्युत प्रकल्पातून या पूर्वीच सुरू असलेला 500 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरूच आहे. त्यामुळे सांडवा व जलविद्युत प्रकल्प असा एकूण 2000 क्युसेक विसर्ग नदी पात्रात असणार आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन कृष्णा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंत्याने केले आहे.








