लांजा :
कोकणातलं मिनी महाबळेश्वर अशी ओळख मिळालेलं माचाळ गाव सध्या पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचा रस्ता, धुक्याची चादर, गारेगार वातावरण आणि डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यामुळे रोज शेकडो पर्यटक याठिकाणी गर्दी करू लागले आहेत. मात्र पर्यटकांच्या धुडगूसामुळे येथील पर्यटनाला गालबोट लागत आहे.
तालुक्यातील माचाळ हे गाव पर्यटकांसाठी तसेच ट्रेकसाठी अनोखा अनुभव देणारे ठरत आहे. गावात स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर रस्ता पोहोचल्याने माचाळ हिल स्टेशन म्हणून जगाच्या नकाशावर आले आहे.
येथे येणारे पर्यटक मद्य पिऊन धुडगूस घालतात, मद्याच्या बाटल्या फोडून वाटेत टाकतात. खाण्याचे पदार्थ रस्त्यात फेकतात. तसेच मद्यप्राशन केलेल्या पर्यटकांकडून आपल्या कुटुंबियांसह येणाऱ्या पर्यटकांना तसेच ग्रामस्थांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
माचाळ येथे सातत्याने होणाऱ्या या प्रकाराने ग्रामस्थ हैराण झाले असून पर्यटनाच्या नावाखाली येणाऱ्या पर्यटकांकडून अश्लिल चाळे, ग्रामस्थांना दादागिरी करून दाखवणे, वस्तूंची अवास्तव मागणी करत धमकी देणे. तेथे असणाऱ्या मुचकुंदी ऋषर्षीच्या गुहेजवळ मद्याच्या बाटल्या टाकून पवित्र ठिकाण अपवित्र करण्याचे कृत्य सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी तयार केलेले गवताचे कुंपण विस्कटून टाकण्याचा प्रकार देखील त्या ठिकाणी घडला आहे.
- गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
पर्यटनस्थळावर सातत्याने होत असलेल्या गैरप्रकारांबाबत माचाळवासीय अक्षरशः कंटाळले आहेत. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून गैरवर्तन करणाऱ्या आणि निसर्ग सौंदर्य बिघडवण्याचे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच चुकीचे कृत्य करणाऱ्या संबंधित पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी माचाळ ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.








