प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक राज्य सरकारने आंतरराज्य सीमावाद आणि नदी वादांवर लक्ष ठेवण्यासाठी कायदामंत्री एच. के. पाटील यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक केली आहे. सोमवारी यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पहिल्या कार्यकाळातही एच. के. पाटील यांनी हीच भूमिका निभावली होती.
महाराष्ट्र सरकारने अलीकडेच सीमाप्रश्नासंदर्भात दोन मंत्र्यांची नेमणूक केली होती. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात कन्नड चळवळ केंद्र समिती आणि विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. या मागणीवरून एच. के. पाटील यांची सीमा समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आंतरराज्य नदी विवादासंबंधीही त्यांच्यावर देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 2013 मध्ये सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली सीमा समन्वयक मंत्री म्हणून एच. के. पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, 2018 मध्ये सत्तेवर आलेल्या कोणत्याही सरकारने सीमा समन्वयक मंत्री नेमले नव्हते.









