भूस्खलन-पुरामुळे 129 रस्ते बंद : गेल्या दहा दिवसात 39 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ शिमला
मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यात राज्यात दमदार पाऊस कोसळत असून सध्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. सतर्कतेमुळे सोमवारी हिमाचलच्या 4 जिह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 20 जून रोजी मान्सूनच्या आगमनापासून 29 जूनपर्यंत हिमाचलमध्ये 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 जण बेपत्ता असून 81 जण जखमी झाले आहेत. यामध्ये सर्पदंश, बुडणे, रस्ते अपघात याशिवाय पाण्यात वाहून गेलेल्या लोकांची आकडेवारी समाविष्ट आहे. पावसामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 19 जणांचा विविध अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.
20 जून ते 29 जून या कालावधीत राज्यात मुसळधार पावसामुळे 7,540.09 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) सर्वाधिक 3472.7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर जलशक्ती विभागाचे 3856.56 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 8 घरे पूर्णपणे कोसळली असून 13 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 8 दुकाने आणि 12 गोठेही पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. अशा दुर्घटनांमध्ये 40 जनावरे वाहून गेल्याची नोंद झाली आहे.
हिमाचल प्रदेशात गेल्या रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भूस्खलनामुळे राज्यातील 129 रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक थांबली आहे. यासोबतच, 612 वीज ट्रान्सफॉर्मर आणि 100 पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर परिणाम झाला आहे. सिरमौरमध्ये 57 आणि मंडीमध्ये 44 रस्ते बंद आहेत. तर मंडीमध्ये सर्वाधिक 340 वीज ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. हिमाचलच्या मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्गावरील थलौतच्या भुभू जोत बोगद्याजवळ सोमवारी सकाळी भूस्खलन झाल्यामुळे अनेक वाहने 5 तास बोगद्यात अडकली होती.









