कराड :
पुणे-बेंगळूरू महामार्गावरील कोल्हापूर नाक्यावर शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ट्रकवर दगडफेक करुन तीन तरुणांनी दहशत माजवली होती. त्यानंतर त्यांनी तेथून पोबारा करत कोल्हापूर गाठले होते. पोलिसांनी शनिवारी तीनही संशयितांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी दुपारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी त्या तिघांची कराड शहरातून चालवित धिंड काढली.
इब्राहिम साजिद सय्यद (वय २२), अमन जावेद सय्यद (वय २२) व उमर समीर सय्यद (वय २२, सर्व रा. सुमंगलनगर, कार्वेनाका, कराड) अशी या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूरु महामार्गावरील कोल्हापूर नाका येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तीन युवकांनी दशहत माजवत ट्रक थांबवला. त्या ट्रक चालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर ट्रकच्या काचेवर दगड फेकून मारण्यात आला. त्यामुळे महामार्गावर वाहतूकही विस्कळीत झाली होते. सदरच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने कराड शहर व परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत होता.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी शनिवारी सापळा रचून मोठ्या शिताफीने संबंधितांना कोल्हापूर परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी दुपारी त्यांची कराड शहरातून धिंड काढण्यात आली. संबंधित युवकांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत








