देशातील दहा विमानतळांना एकाचवेळी बनावट ई-मेल
बेळगाव : सांबरा विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने रविवारी सांबरा विमानतळ प्राधिकरण आणि पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. बॉम्ब निकामी पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने विमानतळ परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, कोठेही स्फोटक वस्तू आढळून न आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सांबरा विमानतळाच्या अधिकृत वेबसाईटवर विमानतळ आवारात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा मेल अज्ञाताने पाठवला.सदर मेल विमानतळ प्राधिकरणाच्या निदर्शनास येताच तातडीने सुरक्षा कमिटीची बैठक बोलाविण्यात आली. ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर तातडीने मारिहाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली.
लागलीच बॉम्ब निकामी व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. विमानतळ परिसरात सकाळपासून दुपारपर्यंत सर्वत्र कसून शोध घेण्यात आला. मात्र, कोठेच स्फोटक वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे सदर मेल बनावट असल्याचे स्पष्ट झाले. सांबरा विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता रविवारी सांबरा विमानतळासह विविध ठिकाणच्या दहा विमानतळांना अशाप्रकारच्या धमकीचे ई-मेल पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मात्र खबरदारी म्हणून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. यापूर्वी देखील अशाप्रकारे सांबरा विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचे ई-मेल पाठविण्यात आले होते. त्यावेळीही तपासणी केली असता कोणतीच वस्तू आढळून आली नव्हती. मात्र, अशा धमकीच्या ई-मेल किंवा फोनकडे दुर्लक्ष करणेही जोखमीचे असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही
सांबरा विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचा एक ई-मेल अधिकृत वेबसाईटवर सकाळी आढळून आला. त्यामुळे ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर शोधकार्य राबविण्यात आले. पण कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही. बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ई-मेल सांबरासह दहा विमानतळांना पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
– एस. त्यागराजन,संचालक सांबरा विमानतळ









