वार्ताहर/तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून जलाशय तुडुंब होण्यासाठी केवळ 5 फूट पाण्याची आवश्यकता आहे. रविवारी सकाळी 16.6 मी. मी पावसाची नोंद झाली तर यावर्षी 1149.1 मी. मी एकूण पाऊस झाला आहे. तर 2469.30 फूट पाणीपातळी नोंद झाली आहे. रविवारी दिवसभरात यामध्ये वाढ होत पाणीपातळीने 2470 फुटाचा टप्पा पार केला आहे. जलाशयाच्या वेस्ट वेअरच्या सहा दरवाजांकडे पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. 2470 फुटापासूनचा पूर्ण क्षमता असलेला 2475 टप्पा पूर्ण होण्यास विस्तारलेल्या पाणी पातळीमुळे कालावधी एक-दोन दिवस जादा लागतो.
चार ते पाच दिवसात जलाशय पूर्ण क्षमतेने तुडुंब होणार आहे. मात्र त्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे 2473 फुटाच्या पाणीपातळीनंतर एक दोन दरवाजे उघडत पाणी सोडण्यात येते. यावर्षी जून महिन्यात मागील दहा वर्षांत प्रथमच पाणीपातळी 2470 फुटावर गेली आहे. मागील वर्षी याच दिवशी पाणीपातळीही 2451.90 फुटावर होती. मागील वर्षीपेक्षा 19.10 फूट पाणी जादा आहे. तर जलाशयातील पाणीसाठा हा 24 फुटाचा आहे. मागील वर्षी 29 जून रोजी 384.6 मी. मी. पाऊस झाला होता. यावेळी मागील वर्षापेक्षा 762.5 मी. मी. पाऊस जादा झाला आहे. मागील पाच वर्षांतील सर्वात जादा पाऊस हा 25 जून रोजी 210.9 मी. मी. इतका नोंद झाला आहे.









