मिरज :
आषाढी एकादशी जवळ येत असल्याने वारकऱ्यांसाठी भजनी वीणा तयार करणाऱ्या तंतुवाद्य कारागिरांची धावपळ सुरू आहे. मिरजेत तयार झालेल्या भजनी वीणा आषाढी कार्तिक वारीला पंढरपूरला पाठविण्यात आल्या आहेत. टाळ व मृदंग व वीणेच्या साथीने वारकरी विठ्ठलाची भक्ती करतात. सावळ्या विठुराच्या नामघोषात दंग असलेल्या वारकऱ्यांच्या हाती मिरजेच्या विणांचा झंकार सुरू आहे.
दरवर्षी आषाढी वारीला पंढरपूरात – सुमारे वीस लाख वारकरी जमतात. या वारकऱ्यांसाठी दरवर्षी सुमारे दहा हजार भजनी वीणाची मागणी असते. मात्र या वीणा तयार करणे वेळखाऊ असल्याने एवढ्या मोठ्या संख्येने वीणांच्या मागणीची पूर्तता होऊ शकत नसल्याचे मिरज तंतुवाद्य व्यवसायिकांनी सांगितले.
मिरजेतील तांतुवाद्य कारागीर भजनी वीणा बनविण्यासाठी प्रसिध्द आहेत. तीन पिढ्या येथील सतारमेकर या नावाने ओळखले जाणारे तंतुवाद्य कारागीर भजनी वीणा बनवितात. दरवर्षी मिरजेत मोठ्या प्रमाणात भजनी वीणा तयार होतात.
तिसऱ्या व चौथ्या पिढीतही मिरजेत वीणा बनविण्याची परंपरा सुरू आहे. आषाढी एकादशी शिवाय कार्तिकी एकादशीला आळंदी येथे व नाथषष्ठीला पैठण येथे मिरजेतून भजनी वीणा रवाना होत असल्याचे तंतुवाद्य व्यवसायिकांनी सांगितले.
वारकऱ्यांसाठी तयार होणाऱ्या भजनी वीणेची किंमत साडेतीन ते नऊ हजार रुपयापर्यंत आहे. भजनी वीणा सुमारे पाच वर्षे टिकते. मिरजेतून आयात करून पंढरपुरात विणांची विक्री होते. भजनी वीणेशिवाय पखवाज व तबल्यालाही मागणी असते. तंतुवाद्य निर्मितीसाठी ख्याती असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांनी पूर्वजांचा वारसा निष्ठेने जोपासला आहे. देश-विदेशातील नामांकित गायक-वादकांना मिरजेतून दर्जेदार तंतुवाद्ये पुरविण्यात येतात. देशातील प्रसिद्ध संगीत महोत्सवात कलाकारांना तंतुवाद्यांचा पुरवठा मिरजेतून होतो.
- तंतूवाद्यावर जीआयची मोहर
दरम्यान, मिरजेत तयार होणाऱ्या तयार होणाऱ्या सतार व तंबोऱ्याला जीआय नामांकनही मिळाले आहे. तंतुवाद्य कला टिकावी, वाढावी यासाठी उद्योग विभागाने सतार व तंबोरा ही तंतुवाद्ये तयार करणाऱ्या कारागिरांसाठी शहरात क्लस्टर योजनेसही काही वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. मिरजेतील तंतुवाद्य निर्माते मजीद सतारमेकर यांना नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.








