भातपीक गेले वाहून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
वार्ताहर/नंदगड
गेला आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदी, नाले दुथडी वरून वाहत आहेत. शेतवडीत मोठ्याप्रमाणात पाणी साचलेले आहे. पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतातील जमिनीत खड्डे पडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना लालवाडी, नावगा, नंदगड परिसरात निदर्शनास आली आहे. खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. तालुक्याच्या काही भागात हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरला असला तरी काही भागात मात्र अती पाणी झाल्यामुळे शेतीचे व शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नावगा परिसरातील तलाव भरला असून त्या तलावातील अतिरिक्त पाणी नावगा, लालवाडी परिसरातील शेतवडीत मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे काही जमिनीत चरी पडल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरलेल्या भात जमिनीत मोठे खड्डे पडले आहेत. मातीबरोबर वाळू व इतर साहित्य शेतवाडीत वाहून गेल्याने पीक पूर्णत: मातीखाली गेले आहे. त्यामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.









