सातारा :
कारी (ता. सातारा) येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी गावातील ओढ्याच्या पाण्यात तरंगताना मिळून आला. जगन्नाथ जिजाबा अडागळे असे त्यांचे नाव आहे. मंगळवारपासून ते बेपत्ता होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जगन्नाथ अडागळे हे मंगळवारी सकाळी त्यांची गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी ओढ्याला पुर आल्याने पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. ते पाण्यात वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने नातेवाईकांनी जगन्नाथ हे बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस व नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. परंतु शुक्रवारी सकाळी जगन्नाथ यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना काही ग्रामस्थांना मिळून आला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर शिवेंद्रराजे टेकर्सच्या टीमला बोलवण्यात आले. टीमच्या सदस्यांनी हा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.








