मनपात खळबळ : आरोग्य विभागात अडचणी
बेळगाव : हयात असलेल्या व्यक्तीला मृत्युदाखला देण्याचा पराक्रम बेळगाव महानगरपालिकेने केल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. सदर व्यक्तीने आपल्या मृत्युदाखल्याचा वापर करून सुमारे 30 लाख रुपयांची इन्शुरन्स क्लेम मिळविल्याची चर्चा आहे. पुन्हा त्याच मृत्यू दाखल्यावर दुसऱ्यांदा क्लेमसाठी अर्ज केल्याचे कंपनीच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने भांडाफोड झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देण्यात आल्याची माहिती मिळाली असून यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत.
शहरातील एका स्मशानभूमीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या इसमाने एका व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करून तो मयत झाल्याचे सांगत तत्कालीन पर्यावरण निरीक्षकांची सही घेतली. त्यानंतर मृत्युदाखला मिळावा, यासाठी महापालिकेच्या जन्म व मृत्यू दाखले विभागाकडे अर्ज दाखल केला. आलेल्या अर्जाची शहानिशा न करताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली. मिळालेला मृत्यू दाखला घेऊन सदर इसमाने 30 लाख रुपयांचा इन्शुरन्स क्लेम मिळविला आहे. सदर रक्कम मिळाल्यानंतरदेखील पुन्हा इन्शुरन्ससाठी अर्ज केल्यानंतर कंपनीच्या निदर्शनास हा प्रकार आला.
त्यामुळे त्यांनी उलट चौकशी केली असता. मृत्यू दाखला देऊन लाटणारा इसम हयात असल्याचे पुढे आले. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पण पोलीस चौकशी म्हणावी तशी न झाल्याने कंपनीने हे प्रकरण आता चौकशीसाठी सीबीआयकडे दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच गेल्या दोन दिवसांपासून मनपाच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. हयात असलेल्या व्यक्तीला मृत्यू दाखला देण्यात आल्याने अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्याशी ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधींनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.









